Marathi News

गांधी कुटुंबाच्या प्रत्येक लग्नात ही साडी नेसली जाते, इंदिरा गांधींशी आहे संबंध, जाणून घ्या

Published:
ही साडी ऐतिहासिक ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे तिच्यासाठी वापरलेले सूत स्वतः इंदिरा गांधींचे वडील जवाहरलाल नेहरू यांनी 1941 साली तुरुंगात असताना चरख्यावर हाताने कातले होते.
गांधी कुटुंबाच्या प्रत्येक लग्नात ही साडी नेसली जाते, इंदिरा गांधींशी आहे संबंध, जाणून घ्या

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा यांचा त्यांच्या दीर्घकाळच्या मैत्रिणी अवीवा बेगशी साखरपुडा झाला आहे. या पार्श्वभूमीवर गांधी कुटुंबातील एका अनोख्या कौटुंबिक परंपरेबद्दल लोकांची उत्सुकता पुन्हा एकदा वाढली आहे.

खरं तर गांधी कुटुंबातील जवळजवळ प्रत्येक लग्नात गुलाबी रंगाची खादीची साडी परिधान करण्याची परंपरा राहिली आहे. ही साडी केवळ कपड्यांचा भाग नसून तिचा एक ऐतिहासिक आणि भावनिक संदर्भही आहे. या गुलाबी खादीच्या साडीचा संबंध थेट इंदिरा गांधी यांच्याशी जोडलेला मानला जातो. या साडीमागची कथा, तिचे प्रतीकात्मक महत्त्व आणि गांधी कुटुंबातील परंपरेतील स्थान यामुळे ती आजही विशेष चर्चेचा विषय ठरते.

स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात तयार झालेली साडी

या परंपरेची सुरुवात 1942 साली झाली, जेव्हा इंदिरा गांधी यांचा फिरोज गांधी यांच्याशी विवाह झाला. स्वातंत्र्यलढ्याच्या शिखर काळात राष्ट्रवादी नेत्यांनी जाणीवपूर्वक ऐश्वर्य आणि विलासिता टाळण्याचा निर्णय घेतला होता. इंदिरा गांधी यांनी रेशीम किंवा ब्रोकेडऐवजी साधी गुलाबी खादीची साडी परिधान करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे त्यांच्या लग्नातील साडी ही केवळ वस्त्र न राहता स्वदेशी आंदोलनाशी जोडलेले एक राजकीय आणि नैतिक विधान बनली.

जवाहरलाल नेहरू यांचे योगदान

ही साडी ऐतिहासिक ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे तिच्यासाठी वापरलेले सूत स्वतः इंदिरा गांधींचे वडील जवाहरलाल नेहरू यांनी 1941 साली तुरुंगात असताना चरख्यावर हाताने कातले होते. जवाहरलाल नेहरू यांनी हे सूत आपल्या मुलीसाठी लग्नाच्या भेटवस्तू म्हणून तयार केले होते.

या साडीच्या डिझाइनलाही एक खोल भावनिक अर्थ आहे. साडीवर कमळाच्या फुलांची आणि पानांची नाजूक चांदीची भरतकाम केलेली आहे. हे भरतकाम कमला नेहरू यांच्या स्मरणार्थ जोडले गेले होते. या माध्यमातून त्यांच्या वारशाचा आणि योगदानाचा सन्मान व्यक्त केला गेला आहे.

पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली परंपरा

ही साडी केवळ इतिहासापुरती मर्यादित राहिलेली नाही. 1968 मध्ये जेव्हा सोनिया गांधी यांचा राजीव गांधी यांच्याशी विवाह झाला, तेव्हा त्यांनीही तीच गुलाबी खादीची साडी परिधान केली होती. त्यानंतर ही परंपरा प्रियांका गांधी यांनीही पुढे चालू ठेवली. 1997 साली आपल्या लग्नासाठी त्यांनी आपल्या आजी इंदिरा गांधी यांचीच ही साडी निवडली.

नंतर 2011 मध्ये वरुण गांधी यांच्या पत्नी यामिनी गांधी यांनी आपल्या लग्नात ही काळजीपूर्वक जपलेली साडी परिधान केली. आज ही गुलाबी खादीची साडी एक अमूल्य कौटुंबिक वारसा बनली आहे.

या साडीच्या मूळ कापडाची वेळोवेळी दुरुस्ती व जतन (रिस्टोरेशन) केली जाते, जेणेकरून मूळ भरतकाम आणि हाताने कातलेले सूत सुरक्षित राहावे. ही साडी एखाद्या संग्रहालयातील वस्तूप्रमाणे केवळ ठेवलेली नाही, तर ती आता एक जिवंत प्रतीक बनली आहे, जी कुटुंबातील आनंदाच्या आणि उत्सवाच्या क्षणी पुन्हा नव्याने साजरी केली जाते.

Follow Us :GoogleNews