Marathi News

चीनच्या राजधानीत पावसामुळे हाहाकार; अनेक नागरिकांचा मृत्यू, 80 हजार लोकांचे स्थलांतर!

Written by:Rohit Shinde
Published:
चीनची राजधानी बीजिंग आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. 
चीनच्या राजधानीत पावसामुळे हाहाकार; अनेक नागरिकांचा मृत्यू, 80 हजार लोकांचे स्थलांतर!

चीनची राजधानी बीजिंग आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटात आतापर्यंत किमान 30 लोकांनी प्राण गमावले असून, अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. राजधानीच्या उत्तरेकडील मियुन आणि यानकिंग जिल्ह्यांत सर्वाधिक हानी झाली आहे. बचाव पथकांकडून बचावाचे काम सुरू आहे. तर जवळपास 80 हजारहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

मदत आणि बचावकार्य सुरू

बीजिंगमधून 30,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, तर संपूर्ण प्रदेशात मिळून 80,000 हून अधिक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते खचले असून, किमान 136 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. शेतकऱ्यांचा हकनाक मृत्यू टाळण्यासाठी आणि बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.  अधिकाऱ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आणि स्थलांतरित नागरिकांसाठी योग्य निवासस्थानांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. मृतांची संख्या वाढू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

चीनमध्ये पावसाने मोठी हानी

मियुन जिल्ह्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर यानकिंग जिल्ह्यात 2 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. याशिवाय, हेबेई प्रांतात भूस्खलनामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुरामुळे वाहने वाहून गेली असून, वीजखांब कोसळले आहेत. परिणामी मृतांची एकूण संख्या किमान 34 वर पोहोचली आहे. तैशिटुन शहरासह अनेक गावांत रस्ते जलमय झाले असून, घरांमध्ये पाणी घुसले आहे. चीनच्या काही भागात आपत्कालीन स्थितीची घोषणा करण्यात आली आहे.

नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे, शाळा बंद ठेवण्याचे, बांधकाम आणि पर्यटन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, बीजिंगमध्ये आजही मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत 30 सेंटीमीटरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सखल भागांपासून दूर राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मियुन जिल्ह्यातील जलाशयात पाण्याची पातळी 1959 पासूनच्या सर्वाधिक स्तरावर पोहोचली असून, तिथून नियंत्रित पद्धतीने पाणी सोडण्यात आले आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews