रशियाकडून युक्रेनच्या अनेक ठिकाणांवर हल्ले, काही गावांवर कब्जा…युध्द थांबण्याचे नाव घेईना!

Written by:Rohit Shinde
Published:
रशियाने युक्रेनवरील हल्ल्यात वाढ केली आहे. मागील 24 तासांत रशियन सैन्याने युक्रेनच्या डोनेत्स्क भागातील दोन गावांवर कब्जा केला आहे.
रशियाकडून युक्रेनच्या अनेक ठिकाणांवर हल्ले, काही गावांवर कब्जा…युध्द थांबण्याचे नाव घेईना!

रशिया आणि युक्रेन या दोन देशांदरम्यानचे युध्द काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येत आहे. रशियाने युक्रेनवरील हल्ल्यात वाढ केली आहे. मागील 24 तासांत रशियन सैन्याने युक्रेनच्या डोनेत्स्क भागातील दोन गावांवर कब्जा केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण आणि पश्चिम सैन्याच्या मोहिमेत दोन गावांवर कब्जा केला. त्यामुळे हे युध्द इतक्यात थांबणार नाही हे यावरून स्पष्ट झाले आहे.

रशियाचे युक्रेनवर हल्ले; युध्दाचा भडका

रशियन सैन्याने युक्रेनी सैन्य औद्योगिक परिसर आणि 143 ठिकाणांवर हल्ले केले. याचबरोबर रशियाच्या वायू रक्षा प्रणालीने मागील आठवड्यात युक्रेनच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत हवाई बॉम्ब आणि 160 ड्रोन नष्ट केले. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प दोन्ही देशांतील युद्ध थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची नुकतीच भेट झाली होती. या बैठकीतही युद्धावर कोणताच तोडगा काढता आला नाही. त्यामुळे या य़ुद्धाबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे.

रशियाकडून युध्द लांबविण्याचा प्रयत्न?

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांच्याशी चर्चा केली. तसेच व्लादिमीर पुतिन यांच्याशीही चर्चा करण्याची तयारी दाखवली. याबाबत सोशल मीडिया पोस्टद्वारे झेलेन्स्की यांनी माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामाफोसा यांच्या विनंतीनुसार त्यांच्याशी मी चर्चा केली. यावेळी मी त्यांना युद्ध थांबवण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. रशियाच्या कोणत्याही नेत्याबरोबर बैठकीस तयार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. परंतु, रशिया मात्र युद्ध लांबवण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प धमकी दिली की जर दोन आठवड्यांत युक्रेनमध्ये शांततापूर्ण तोडगा निघाला नाही तर रशियावर नवीन निर्बंध लागू केले जातील.  मात्र ट्रम्प यांच्या इशाऱ्यांमुळे रशियाच्या भूमिकेत कोणताही मोठा फरक पडताना दिसत नाही.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews