मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या वर्षी निवृत्त व्हावे, असं संघातर्फे सांगण्यात आलं आहे, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात मोरोपंत पिंगळेंबाबत बोलताना पंच्याहत्तरीनंतर बाजूला व्हायला हवे, या वक्तव्याच्या पार्श्वभूमीर राऊत यांचं हे विधान आलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले होते त्यावेळी त्यांना निवृत्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या, याबाबत सविस्तर लिहलं होतं असं संजय राऊत म्हणालेत. सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी हे 75 वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पिकली आहे, केसही उडाले आहेत. त्यांचे जगभ्रमण करुन झाले आहे, सत्तेचे सर्व सुख त्यांनी भोगले आहे. आता जो नियम त्यांनीच केला, त्याच नियमानुसार संघ त्यांना वारंवार निवृत्त होण्याची सूचना देत असल्याचं राऊत म्हणालेत.
मोदी-शाहांच्या निवृत्तीचे विचार हे शुभसंकेत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना निवृत्तीनंतर प्राकृतिक शेती करण्याचं विधान केलं होतं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी आणि शाहा यांच्या मनात निवृत्तीचे विचार येतायेत हे देशासाठी शुभसंकेत असल्याचं राऊत म्हणालेत. निवृत्तीनंतर कुणी काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असंही राऊत म्हणालेत. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ही त्या त्या वेळी निवनडणुकांपुरती होती आता स्थआनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत त्यांची गरज नसल्याचंही राऊत म्हणालेत.
काय म्हणाले होते मोहन भागवत?
नागपुरात बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोरोपंत पिंगळेंच्या संदर्भात एक विधान केलं होतं. त्यात त्यांनी ७५ वर्षांनंतर निवृत्तीबाबत वक्तव्य केलं होतं. जेव्हा तुमच्या खांद्यावर 75 वर्षांची शाल पडते तेव्हा तुम्ही थांबायला हवं आणि दुसऱ्यांना संधी द्यायला हवी, असं विधान भागवतांनी केलं होतं





