येत्या 24 तासांत भारतावर जास्त टेरिफ लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य, केंद्राचंही जोरदार प्रत्युत्तर

Written by:Smita Gangurde
Published:
केंद्र सरकारनं यावर उत्तर देताना, रशियाकडून अमेरिका आणि युरोपियन युनियनला होणाऱ्या निर्यातीचे आकडे दिले आहेत.
येत्या 24 तासांत भारतावर जास्त टेरिफ लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य, केंद्राचंही जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २४ तासांत जास्त टेरिफ आकरणार असल्याचं वक्तव्य केलंय. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भारत हा चांगला बिझनेस पार्टनर नाही असंही म्हटलंय. भारत आकारत असलेला आयात कर म्हणजेच टेरिफ जगात सर्वाधिक असून याबाबत कुणीही खुलेपणानं बोलत नाही, असा आक्षेपही ट्रम्प यांनी व्यक्त केलाय.

भारत अमेरिकेशी सर्वाधिक व्यापार करतो, असं ट्रम्प यांचं म्हणणंय. मात्र इतका व्यापार करुनही अमेरिकेला भारताकडून फारसा फायदा होत नसल्याचं ट्रम्प म्हणालेत. यासाठी भारतावर 25 टक्के टेरिफ आकारण्याचा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय. 7 ऑगस्टपासून हा नवा टेरिफ लागू होणार असून, येत्या 24 तासांत त्यात वाढ करण्यात येईल, असंही ट्रम्प म्हणालेत.

रशियासोबत व्यापाराबाबत नाराजी

अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारात समतोल नसल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे. भारत रशियासोबत व्यापार करुन युक्रेनच्या विरोधात रशियन वॉर मशिन्सना इंधन पुरवत असल्याची टीकाही ट्रम्प यांनी केली आहे. यामुळेच अमेरिकेनं कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलंय.

केंद्र सरकारचंही अमेरिकेला प्रत्युत्तर

25 टक्के टेरिफ आकारण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर केंद्र सरकारच्या वतीनंही अमेरिकेचं नाव घेत याला प्रत्युत्तर दिलंय. रशियाच्या हल्ल्यात किती नागरिक मरतायेत, याची भारताला पर्वा नाही, असं ट्रम्प यांनी सोमवारी लिहिलं होतं. त्यामुळे भारतावर टेरिफ वाढवणार असल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं.

केंद्र सरकारनं यावर उत्तर देताना, रशियाकडून अमेरिका आणि युरोपियन युनियनला होणाऱ्या निर्यातीचे आकडे दिले आहेत. अमेरिका त्यांच्या आण्विक उद्योगांसाठी रशियातून युरेनियम हेक्साफ्लोराईड, इलेक्ट्रिक व्हेकलसाठी पॅलेडियम, खतं आणि रसायनं आयात करते आहे. हेच युरोपियन युनियनही करीत आहेत. अशा स्थितीत भारताला लक्ष्य करणं अनुचित आणि तर्कहीन असल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्तायंनी दिली आहे.

भारताच्या राष्ट्रीय हितासाठी योग्य पावलं उचलली जातील, असंही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलंय. यासह परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही एका कार्यक्रमात आता जगाच्या व्यवस्थेत कोणत्याही एकाचा दबदबा असणार नाही, असं वक्तव्य करत एकाअर्थी डोनाल्ड ट्रम्प यांनाच लक्ष्य केल्याचं मानण्यात येतंय

Follow Us :GoogleNews