धक्कादायक अशी दहशतवादी हल्ल्याची बातमी आसाममधून समोर येत आहे. मणिपूर राज्यातील विष्णूपूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर, तीन जण जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर उपचार सुरू असून परिसरात लष्कराचे सर्च ऑपरेशन सध्या सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
आसाम रायफल्सच्या ट्रकवर हल्ला
घटना नांबोल सबल लेइकाई भागात सायंकाळी 6 वाजता घडली. आसाम रायफल्सचे जवान इम्फाळहून विष्णूपूरला निघाले होते. पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मणिपूरच्या विष्णूपर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एक जेसीओ आणि एका जवानाचा समावेश आहे. आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर दहशतवादी एका पांढर्या व्हॅनमधून पळून गेले. आसाम रायफल्सच्या जवानांनी संयमानं प्रत्युत्तराची कारवाई केली. यात सामान्य नागरिकांना इजा होऊ नये याची काळजी घेण्यात आली. सरक्षा दलांनी या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांना पकडण्यासाठी अभियान सुरु केलं आहे.
‘भ्याड हल्ल्यांना उत्तर देणार’
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की आमच्या 33 आसाम रायफल्सच्या बहादूर जवानांवरील हल्ला दु:खद आहे. दोन जवान शहीद झाले आणि इतर तिघे जखमी झाल्यानं धक्का बसल्याचं बिरेन सिंह म्हणाले. शहीदांचं शौर्य आणि बलिदान नेहमी लक्षात ठेवलं जाईल. गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी, असं बिरेन सिंह म्हणाले.
राजभवनाकडून जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार आसाम रायफल्सचे दोन जवान देशाचं संरक्षण करताना शहीद झाले. राज्यपालांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. जखमींची प्रकृती लवकर बरी व्हावी,अशी प्रार्थना करत असल्याचं सांगण्यात आलं. याशिवाय अशा भ्याड हल्ल्यांना सहन केलं जाणार नाही, असंही सांगितलं. देशभरातून शहीद जवांनाबाबत शोक व्यक्त केला जात असून या हल्ल्याचा निषेध नोंदवला जात आहे.






