इराण आणि इस्रायलमधील शस्त्रसंधी अवघ्या अडीच तासांत मोडली, ट्रम्प यांचा प्रयत्न अयशस्वी

Written by:Smita Gangurde
Published:
Last Updated:
इराणनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर इस्रायलनं सैन्याला तेहरानवर हल्ला करण्याचा आदेश दिला.
इराण आणि इस्रायलमधील शस्त्रसंधी अवघ्या अडीच तासांत मोडली, ट्रम्प यांचा प्रयत्न अयशस्वी

तेहरान- संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या इराण आणि इस्रायल युद्धात शस्त्रसंधी झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी जाहीर केलं होतं. त्यानंतर जगभरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र हा आनंद अल्पजीवी ठरलाय. अवघ्या अडीच तासात ही शस्त्रसंधी दोन्ही देशांकडून मोडण्यात आली असून दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले सुरुच असल्याचं समोर आलंय.

शस्त्रसंधी सुरु झाल्यानंतर अवघ्या अडीच तासांनंतर इराणनं इस्रायलवर 6 बॅलेस्टिक मिसाईल डागले. यातील एक मिसाईल बीर्शेबा शहरात एका इमारतीवर कोसळलं यात पाच जणांचा मृत्यू झाला. याला तातडीनं इस्रायलकडून प्रत्युत्तर देण्यात आलं.

तेहरानवर इस्रायलचा हल्ला

इराणनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर इस्रायलनं सैन्याला तेहरानवर हल्ला करण्याचा आदेश दिला. त्यानंतर थोड्याच वेळात तेहरानच्या रडार साईटवर इस्रायलकडून हल्ला करण्यात आला.

ट्रम्प यांच्या प्रयत्नांना अपयश

इस्रायलनं हा हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन करुन इराणवर हल्ला न करण्याची विनंती केली होती. मात्र लेत्यनाहू यांनी ही विनंती फेटाळल्याची माहिती आहे. इराणनं पहिल्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यामुळे त्याला उत्तर देणं गरजेचं आहे असं इस्रायलच्या वतीनं ट्रम्प यांनी सांगण्यात आल्याची माहिती आहे.

12 व्या दिवशी युद्धबंदीची आशा मावळली

इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा आजचा बारावा दिवस आहे. दोन्ही देशात बाराव्या दिवशी शस्त्रसंधी झाल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी पहाटे केली होती. त्यानंतर सकाळी साडे दहाच्या सुमारास आतापासून शस्त्रसंधी लागू असून कृपया तोडू नका, असं आवाहनही ट्रम्प यांनी केलं होतं.

इराणमध्ये तख्तापलटास ट्रम्प यांचा विरोध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील तख्तापलटावर पुन्हा भूमिका बदलली आहे. इराणमध्ये सत्तांर होऊ नये या मताचा असल्याचं सांगत लवकरात लवकर शांतता नांदावी, असं मत ट्रम्प यांनी व्यक्त केलंय. तख्तापलट झाला तर त्यामुळं अशांतता निर्माण होईल आणि हे अमेरिकेला पाहायचं नाही, असंही ट्रम्प म्हणालेत. शनिवारी त्यांनी याच्या विरुद्ध विधान केलं होतं. सध्याचं इराणमधील सरकार जर इराणला पुन्हा महान घडवू शकत नसेल तर सत्ता परिवर्तन का व्हायला नको, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

 

Follow Us :GoogleNews