Marathi News

मुंबईत दिड दिवसांच्या गणरायांचे भक्तीभावाने विसर्जन, लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने भाविकांनी दिला निरोप

Written by:Astha Sutar
Last Updated:
आज मुंबईतील विविध भागात अनेक सागरी किनारी तसेच अनेक कृत्रिम तलावात लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. यावेळी भाविकांनी भक्तीपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
मुंबईत दिड दिवसांच्या गणरायांचे भक्तीभावाने विसर्जन, लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने भाविकांनी दिला निरोप

Ganeshotsav 2025 – गेल्या कित्येक दिवसांपासून बाप्पाच्या आगमनासाठी भाविक आतुर होते. अखेर बुधवारी (27 ऑगस्ट) रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले होते. लाडक्या बाप्पा जसा सामान्य लोकांच्या घरी विराजमान झाला आहे, तसे तो सेलिब्रेटी, राजकारणी दिग्गज लोकांच्या घरीही विराजमान असतो. मोठ्या सार्वजनिक मंडळतील गणपीत हे ११ दिवसांचे असतात. तर लहान गणपती हे दिड आणि पाच दिवसांचे असतात. दरम्यान, काल विराजमान झालेल्या बाप्पाचे आज दिड दिवसानंतर मुंबईत ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आले.

कृत्रिम तलाव व सागरी किनारी विसर्जन

दरम्यान, आज मुंबईतील विविध भागात अनेक सागरी किनारी तसेच अनेक कृत्रिम तलावात लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. यावेळी भाविकांनी भक्तीपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… गणपती निघाला गावाला…चैन पडेना आम्हांला… अशा घोषणा देण्यात आल्या. तर पर्यावरणाचा समतोलपणा राहावा म्हणुन सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश मुर्ती या शाडू पासून तयार करण्यात याव्यात म्हणून पालिकेने मुर्तीकरांना आवाहन केले होते. शिवाय हजारो टन शाडूमाती मुर्तीकारांना मोफत देण्यात आली होती.

इको फ्रेंडली कृत्रीम तलावाची निर्मिती

काही ठिकाणी गणेश मुर्तीमुळे पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणुन काही पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली होती. त्यावर पर्याय म्हणुन गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह राज्यात कृत्रीम तलावाची निर्मिती केली जात आहे. पालिकेने मुंबईत सर्व ठिकाणी लहान मुर्तींच्या विर्सजनासाठी कृत्रीम तलाव तयार केले असून या तलावात मुर्तींचे विसर्जन करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. इको फ्रेंडली कृत्रीम तलावाची निर्मिती यंदा सर्व ठिकाणी करण्यात आली असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गेल्या काही वर्षापासून हा प्रयत्न केला जात आहे.

तर दुसरीकडे नदी, तलाव या ठिकाणी लहान गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याऐवजी कृत्रीम तलावात विसर्जन करण्यात यावे, अशी विनंती पालिकेतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व ठिकाणी कृत्रीम तलाव बांधण्यात आले आहेत.

पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी

गणेश विसर्जनादरम्यान ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यासोबतच गणेशमूर्ती विसर्जनस्थळी समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले आहेत. ब्ल्यू बटन जेलीफिश आणि स्टिंग रे प्रजातीच्या माशांच्या संभाव्य वावराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews