संपूर्ण देशाला ज्याची प्रतीक्षा होती तो उपराष्ट्रपती पदाचा निकाल (Vice President Election Result) आता समोर आला आहे. खरंतर इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए यांच्यात या निवडणुकीबाबत मागील महिन्याभरा पासून जोरदार घामासान पाहायला मिळत होतं. आपणास उपराष्ट्रपती व्हावा यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी करण्यात आली होती, राजकीय गाठीभेटी होत्या… ही फक्त विजयाची नव्हे तर विचारधारेची लढाई आहे, असे यावेळी विरोधकांकडून सांगण्यात आले होते. अखेर आज उपराष्ट्रपती पदाचा चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांची भारताच्या नव्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा त्यांनी दणदणीत पराभव केला आहे.
कोणाला किती मते मिळाली?? Vice President Election Result
मतमोजणीनुसार उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकूण 768 खासदारांनी मतदान केले होते. यामध्ये एनडीए चे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना एकूण 452 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना एकूण 300 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. त्यामुळे सीपी राधाकृष्णन यांच्या रूपाने भारताला नवे उपराष्ट्रपती मिळाले आहेत.
इंडिया आघाडीचे पानिपत –
कोणत्याही परिस्थितीत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकायची यासाठी इंडिया आघाडी आणि एनडीए दोन्ही बाजूने जंग जंग पछाडलं होतं. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही चूक होऊ नये यासाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी मतदान प्रक्रियेची रंगीत तालीम केली होती. ही निवडणूक आम्ही जिंकणार असा दावा विरोधकांनी केला होता तर दुसरीकडे आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे त्यामुळे तुमच्या जिंकण्याचा प्रश्नच येत नाही असं सत्ताधाऱ्यांकडून ठणकावून सांगण्यात येत होतं. अखेर सत्ताधारी एनडीएने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बाजी मारली आणि इंडिया आघाडीचं पुरतं पानिपत केलं.
खरं तर मतदान संपल्यानंतर, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दावा केला होता की विरोधी पक्ष मतदानात पूर्णपणे एकजूट राहिला आहे आणि त्यांच्या सर्व ३१५ खासदारांनी मतदानात भाग घेतला. अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की विरोधी पक्षाची १५ मते कुठे गेली?? दुसरीकडे १५ मते अवैध ठरली ही देखील विशेष बाब आहे.






