तणावातून जात असलेल्या असलेल्या जगासाठी योग आवश्यक, विशाखापट्टणममध्ये काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Written by:Smita Gangurde
Published:
योग दिन जगभरात साजरा करण्यात येत असून, अधिकृत आकडेवारीनुसार 191 देशांत 1300 जागी योग दिनाचे 2000 हून अधिक कार्यक्रम शनिवारी पार पडतायेत.
तणावातून जात असलेल्या असलेल्या जगासाठी योग आवश्यक, विशाखापट्टणममध्ये काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

PM Modi Yoga

विशाखापट्टणम – जगभरात शनिवारी योग दिवस साजरा करण्यात येतोय. जागतिक योग दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणममध्ये 3 लाख नागरिक आणि 40 देशांच्या राजकीय नेते, अधिकाऱ्यांसमवोत योगाची आसने केली.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग आणि योगाचं जगासाठीचं महत्त्व विषद केलं. योग याचा अर्थ जोडणे असा होतो हे सांगत, योगाने संपूर्ण जगाला एकमेकांशी जोडलं असल्याचं पंतप्रधान म्हणालेत.

योग शांतीची मार्ग दर्शवतो- मोदी

सद्यस्थितीत जगात अशांती, तणाव आणि अस्थिरता वाढत आहे, अशा स्थितीत योग शांतीची दिशा दर्शवतो, असं महत्त्वाचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. योग हे या सगळ्या प्रक्रियेत पॉझ बटणासारखी भूमिका बजावत असल्याचंही मोदींनी म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीचंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही योगाची आसने केली. यावर्षीची योग दिनाची थीम ही ‘एक पृथ्वी, एका आरोग्यासाठी योग’ अशी आहे. योग दिन जगभरात साजरा करण्यात येत असून, अधिकृत आकडेवारीनुसार 191 देशांत 1300 जागी योग दिनाचे 2000 हून अधिक कार्यक्रम शनिवारी पार पडतायेत.

पंतप्रधानांच्या भाषणातले चार महत्त्वाचे मुद्दे

1. कोट्यवधी लोकांच्या जगण्याचा योग अविभाज्य घटक झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी भाषणात म्हणालेत. दिव्यांग सहकारी हे ब्रेल लिपीतून योग शास्त्र शिकतायेत, हे पाहून अभिमान वाटतो असंही मोदी म्हणालेत. जगभरातील शास्त्रज्ञ अंतराळात योग करतायेत, गावा गावात तरुण योग ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होतायेत हे पाहून आनंद होत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलंय.

2. या घडीला नौदलाच्या जहाजावरही योग दिनाचा कार्यक्रम सुरु असल्याची माहिती पंतप्रधानांनी भाषणात दिली. ओपेरा हाऊसचा जिना असो वा एव्हरेस्ट शिखर असो, सगळीकडे योग करण्यात येत असल्याचं सांगत यातून योग सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांसाठी आहे हा एकच संदेश जात असल्याचं मोदी म्हणालेत.

3. योग हा वैयक्तिक सरावा भाग न राहता , जागतिक सहभागाचं आणि भागिदारीचं माध्यम व्हावं, अशी अपेक्षा यावेळी पंतप्रधांनांनी व्यक्त केली. लोकनितीचा योग हा भाग व्हावा अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. मी टू वी म्हणजे स्वतापासून आपणापर्यंत भाव हा भारताचा आत्मा असल्याचं यावेळी मोदी म्हणालेत.

4. जगभरात योगाचा प्रसार व्हावा यासाठी योग विज्ञानात आधुनिक संशोधन भारतात करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. योग आधारित थेरपीचा विस्तार व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. या विषयात दिल्लीच्या एम्सनं महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्याचंही मोदी म्हणालेत.

आंध्र प्रदेशात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

योग दिनाच्या निमित्तानं आंध्र प्रदेशात वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यात आलाय. या कार्यक्रमात 50 लाखांपेक्षा जास्त योग प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय. आंध्र प्रदेश सरकारकडून योग आंध्र अभियान सुरु करण्यात आलंय.

Follow Us :GoogleNews