मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणचा आज पाचवा दिवस आहे. त्यांनी दोन दिवसांपासून पाणी ही त्यागले आहे. तर आज त्यांनी वैद्यकीय पथकालाही परतावून लावले. सरकार दरबारी केवळ जोर बैठका सुरू आहेत. तर काही जण हायकोर्टाच्या माध्यमातून आंदोलनाला कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत आज मुंबईत नेमक्या काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याबाबत सविस्तर आणि अधिक जाणून घेऊ…
कोर्टात आज महत्वपूर्ण सुनावणी होणार
आंदोलनातील काही हुल्लडबाजांमुळे मराठा समाजाला बदनाम करण्याचाही प्रयत्न होत असल्याचे आंदोलक सांगत आहेत. सामान्य मुंबईकरांना वेठीस धरून मागण्या कशा पदरात पाडून घेणार असा सवाल ही करण्यात येत आहे. आज हायकोर्टात सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात सुनावणी होणार आहे. गेल्या दहा वर्षांतील आंदोलनाचा इतिहास पाहता मराठ्यांनी अभूतपूर्वी शिस्तीचे पालन केल्याचे दिसून येते. त्यामुळे आंदोलनातील हे घुसखोर शोधून त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याचे आवाहन आंदोलकांसमोर आहे. आज कोर्टात होणार सुनावणी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी देखील आंदोलकांनी शांतता आणि संयम राखावा असे आवाहन केले आहे. शिवाय कोर्टाच्या आदेशाचे पालन करा असेही बजावले आहे.
“मेलो तरी चालेल, आरक्षण घेणार…”
दरम्यान, मेलो तरी चालेल…, पण आरक्षण घेऊनच उठणार आहे. असा इशारा जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गर्दीचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. तसेच सीएसएमटी स्थानक आणि दक्षिण मुंबईतील परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. आंदोलनाचा त्रास मुंबईकरांना होत आहे. तसेच पार्किंग ठिकाणी गाड्या न लावता रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत. त्या गाड्या आंदोलकांनी मैदानात लावावा. आणि मैदानातच राहावे, असे मी आंदोलकांना आवाहन करतो. आणि ज्यांना कुणाला हे ऐकायचं नसेल त्यांनी आपल्या गावी जावं, असं आवाहन जरांगे-पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना केलं.
मनोज जरांगेंचा ‘तो’ प्रस्ताव सरकार मान्य करेल ?
“सरकारने 13 महिन्यांपूर्वी कागदपत्र घेतली असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सातारा संस्थानचे आणि हैदराबाद संस्थानचे गॅझेटियरमध्ये संपूर्ण मराठवाडा बसतो असं ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर सातारा संस्थानाचे गाझेटियर मराठवाड्यातला मराठा कुणबी असल्याचं सांगतो असं जरांगे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सरकारला अडथळा असणे शक्य नाही असंही जरांगे म्हणाले. 58 लाख नोंदी आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, ज्यांच्या नाही सापडल्या त्यांची पोट जात घ्या आणि अध्यादेश काढा असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. कुणबी ही उपजात आहे हेच कायदा सांगतो. ओबीसी पात्र करायचं असेल तर पोटजात उपजात म्हणून मराठा कुणबी म्हणून घ्या. सरसकट म्हणायची गरज नाही असंही ते म्हणाले. त्यामुळे आता आगामी काळात जरांगेंनी मांडलेला हा प्रस्ताव सरकार मान्य करते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या
- मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, ही मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे.
- हैदराबाद गझेटियर, सातारा गॅझेटीयर, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आले आहेत.
- सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे आरक्षणात घेण्याची मागणी.
- सरसकट गुन्हे मागे घेणार होते. त्यासंदर्भात आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
- ओबीसी कोट्यातून कायद्याच्या चौकटीत टीकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळावे.






