‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही पहिल्या महिन्यापासूनच चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळण्यातही या योजनेचा वाटा होता. मात्र विरोधकांनी या योजनेवरी बरीच टीका केली. त्यानंतरया योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या अनेकांची नावंही समोर आली, त्यांना या योजनेतून आता वगळण्यात आलं आहे. योजना आदिवासी आमदारांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी या योजनेमुळे आदिवासींचा निधी दुसरीकडे वळवण्याचा आरोप केला आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून अधिवेशनामध्ये हा विषय उपस्थित करण्याचा इशारा दिला आहे.
आमश्या पाडवींचा आक्षेप काय?
‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली आहे पण योजनेमुळे आदिवासींचं नुकसान झालं’ अशी प्रतिक्रिया महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने दिली आहे. शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी हे विधान केलं असून त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदिवासी विभागाचा निधि दिला जाऊ नये यासाठी पत्र दिलं आहे असंही पाडवी यांनी म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर बहिणींसाठी आमचे पैसे जात असतील अधिवेशनात विषय मांडू असं मोठं विधानही पाडवी यांनी केलं.
योजनेचा पैसा उभारण्याचा प्रश्न
आदिवासींचे पैसे योजनेसाठी वळवू नका, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहोत. लाडकी बहीण योजना चांगली आहे, परंतु या योजनेसाठी दुसरा विभागाच्या निधी घ्यावा. आमच्या आदिवासी विभागाचे पैसे घेऊ नयेत, त्या निधीला हात लावू नका, अन्यथा त्यामुळे आदिवासीचं नुकसान होईल असं म्हणत मुख्यमंत्र्यांशीही या विषयावर बोलणार असल्याचं सांगत येत्या अधिवेशनातही हा विषय मांडणार असल्याचा पुनरुच्चार पाडवी यांनी केला.
याआधीच्या काळात सामाजिक न्याय खात्याचा निधी देखील असाच लाडकी बहिण योजनेच्या पैशांच्या तरतुदीसाठी वळविण्यात आला होता. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी असाच आपला संताप बोलून दाखवला होता. त्यामुळे अशी खदखद आता सातत्याने समोर येताना दिसत आहे.






