मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी कुणबी दाखले वाटपासाठी प्रशासनाची तयारी सुरू; मराठा समाजासाठी महत्वाचा क्षण

Written by:Rohit Shinde
Published:
मराठवाड्यात लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करा, अशी मागणी मनोज जरांगे करत आहेत. त्यामध्ये आता प्रशासनाकडून महत्वपूर्ण हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी कुणबी दाखले वाटपासाठी प्रशासनाची तयारी सुरू; मराठा समाजासाठी महत्वाचा क्षण

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एक मोठी बातमी समोर येत आहे. कारण सरकारने अलीकडेच मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आता मोठ्या घडामोडी घडत आहेत. मराठवाड्यात लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करा, अशी मागणी मनोज जरांगे करत आहेत. त्यामध्ये आता प्रशासनाकडून महत्वपूर्ण हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

कुणबी दाखल्यांच्या वाटपाचे मोठे नियोजन

मराठवाड्यात कुणबी दाखले देण्यासंदर्भात प्रशासनाची लगबग सुरू आहे. हैदराबाद गॅझेटच्या आधारावर कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर मराठा कुणबी दाखल्यांचे वाटप करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. येत्या सतरा सप्टेंबर रोजी, म्हणजेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी, हे दाखले वाटप केले जाणार आहेत. यासाठी विभागीय स्तरावर विशेष प्रयत्न सुरू आहेत. दाखले देण्याची प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यासाठी पुढील दोन दिवसांत तलाठी, ग्रामसेवक आणि सहायक कृषी अधिकारी यांच्यासाठी खास प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे मराठवाड्यातील पात्र व्यक्तींना कुणबी दाखले मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. प्रशासनाने या कामासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत.

खरंतर नोंदीच्या आधारे मराठा समाजातील ज्या कुटुंबांना हे दाखले मिळतील, त्यांचा थेट ओबीसी आरक्षणामध्ये समावेश होणार आहे. त्यामुळे आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजाच्या दृष्टीने हा एक महत्वपूर्ण आणि महत्वाचा बदल असणार आहे. यामुळे समाजातील नागरिकांना थेट ओबीसी समाजाचे लाभ मिळू लागतील.

हैदराबादनंतर आता सातारा गॅझेटसाठी हालचाली

आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनादरम्यान जरांगे पाटालांकडून हैदराबाद गॅझेटसह सातारा गॅझेटचीदेखील मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता सातारा गॅझेटसाठीदेखील शासनदरबारी वेगवाग हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात दोन बैठकांचे आयोजन करण्यात आलं आहे. तर शिंदे समितीच्या अहवालाबाबतदेखील आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात काम करत असलेल्या शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews