मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्वाचा जीआर निघाल्यानंतर राज्यातील ओबीसी नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. राज्य सरकारची उपसमिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सकारात्मक बैठक झाली. गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन पुकारलेल्या मराठा समाजाला या बैठकीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या बैठकीत जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. यानंतर गुलाल उधळून आंदोलकांनी मुंबईत आनंद साजरा केला.
दरम्यान यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं सांगितलं जात आहे. भाजप नेत्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आणि त्यांचे आभार मानले. दुसरीकडे महायुती सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी मात्र यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. भुजबळांना प्रकरणात आता थेट सरकारला इशारा दिला आहे.
भुजबळांचा राज्य सरकारला थेट इशारा
“एका तासामध्ये दोन-दोन जीआर निघाले. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाच्या सचिवांची सही देखील आहे. पहिल्या जीआरवर मराठा समाजाच्या ‘पात्र’ व्यक्तींना म्हटले. जरांगेंनी ऑब्जेक्शन घेतले अन् पात्र शब्द काढायला सांगितला. त्यानंतर दुसरा जीआर काढला. त्यात पात्र शब्द काढला गेला. जर चुकीचं होत असेल तर मी कसं काय गप्प राहू शकतो? मी माझे मत मांडणार,” असा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला दिला आहे.
जीआर विरोधात कोर्टात जाऊ; भुजबळांची भूमिका
मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारनं नुकताच नवा जीआर काढला असला तरी त्यावरचं राजकारण चांगलंच तापलं आहे. या जीआरवर आक्षेप घेत राज्याचे मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी थेट सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. “सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येऊ शकते. जर गरज पडली तर आम्ही या जीआरविरोधात येत्या चार दिवसांत न्यायालयात जाणार आहोत,” अशी ठाम भूमिका भुजबळांनी घेतली आहे.
“आता वर्षा दोन वर्षापासून सुरू आहे की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या. सरसकट शब्दाला कोणी देखील ऑब्जेक्शन घेणार. त्यामुळे सरसकट शब्द काढून शब्दांची हेराफेरी केली आणि द्यायचे ठरवले. म्हणून तर ते मनोज जरांगे परत गेले, गुलाल उधळला गेला,” असे छगन भुजबळ म्हटले. त्यामुळे या प्रकरणात आगामी काळात छगन भुजबळ आणखी काही आक्रमक भूमिका घेतात, का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






