Marathi News

“मराठा आणि कुणबी एक नाहीत”…छगन भुजबळांनी मांडली भूमिका; मनोज जरांगेंवर टीकास्त्र

Written by:Rohit Shinde
Published:
मराठा आणि कुणबी एक आहे हा मूर्खपणा आहे, हे कोर्ट म्हणाले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळांनी मनोज जरांगेंवर देखील टीका केली आहे.
“मराठा आणि कुणबी एक नाहीत”…छगन भुजबळांनी मांडली भूमिका; मनोज जरांगेंवर टीकास्त्र

मुंबईतल्या आझाद मैदानावर आता 5 हजार आंदोलकच आंदोलन करु शकतील. इतर मराठा आंदोलकांनी मुंबई रिकामी करावी, असे आदेश मंबई हायकोर्टानं दिलेत. सोमवारी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायलयात याप्रकरणी सुनावणी झाली. आता कोणालाही मुंबईत येऊ देऊ नका, उद्या दुपारपर्यंत जिथे रस्ते अडवण्यात आले आहेत, ते आंदोलक हटवा, असे आदेशही कोर्टानं दिलेत. त्यामध्ये कोर्टाच्या आजच्या या निर्णयाचा दाखला देत मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर टीकेची तोफ डागली आहे.

नेमकं काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ?

ओबीसी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेत्यांची काय भूमिका असणार? याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी, हायकोर्टाचा दाखल देत उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणाही साधला. आज आम्ही सर्व ओबीसी नेते एकत्र जमलो होतो, तायवाडे त्यांचे उपोषण तिकडे सुरू आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाही. आमदार गोपीचंद पडळकर बाहेर आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाही.  मुंबईत आज आंदोलन सुरू आहे, त्यात अनेक गोष्टी तुम्ही दाखवल्या आहेत. त्यात उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मराठा आणि कुणबी एक आहे हा मूर्खपणा आहे, हे कोर्ट म्हणाले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

आंदोलकांना मुंबई मोकळी करण्याचे आदेश

न्यायालयाने मंगळवारपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश दिल्यानंतर आता मनोज जरांगे यांनीही आंदोलकांना आवाहन केलं आहे. मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, कुणाचं ऐकून गोंधळ घालू नका असं आवाहन जरांगे यांनी केलं. मुंबईच्या रस्त्यांवर असलेल्या गाड्या आझाद मैदानाच्या बाजूच्या क्रॉस मैदानात लावा, तिथेच झोपा असंही जरांगे म्हणाले. जर कुणी ऐकणार नाही तर त्याने गावाकडे परत जावं, कुणाच्या आदेशावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना स्थान नाही. मी शेवटचं सांगतोय, आंदोलनाला बदनाम करू नका अन्यथा सोडणार नाही असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला. त्यामुळे आता उद्या मुंबईत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews