मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान आणि मंत्रालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून सुरू होणार असून, तीन दिवसांनंतर मुंबईत आझाद मैदान व शासन दरबारी अर्थात मंत्रालयावर मराठा समाजाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगेंच्या टीकेचे लक्ष आहेत. जरांगेंनी फडणवीसांवर दंगल भडकवण्याचा आरोप केला. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
जरांगेंच्या डोक्यावर परिणाम -देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. जरांगेंच्या आरोपाविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले की, “जरांगेंनी मागच्या वेळी उपोषणाच्या शेवटी जरांगे माझ्या आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफीही मागितली होती आणि सांगितलं होतं की, जरा उपोषणामुळे डोक्यावर परिणाम झालाय, त्यामुळं मी रागारागाने बोललो, असं ते म्हणाले… आपण असं समजूया, आताही उषोषणामुळे जरांगेंचा संताप झाला.” त्यामुळे फडणवीसांनी जरांगेंच्या बाबतीत मिश्किल प्रतिक्रिया या निमित्ताने दिली आहे…
जरांगेंचे फडणवीसांवर नेमके काय आरोप?
फडणवीसांनी ओबीसी नेत्यांचे कान भरले आहेत. त्यांचा राज्यात दंगली घडवण्याचा डाव आहे. फडणवीस हे षडयंत्र रचत असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. आधी चर्चा खोटी वाटत होती, मात्र सिद्ध झाले आहे. मी मॅनेज होत नाहीय, त्यामुळ फडणवीसांना माझ्यावर हल्ला करायचा आहे, पण फडणवीस यांनी माझ्या नादाला लागू नये, असंही जरांगे म्हणाले होते.
ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळविणार -जरांगे
दुसरीकडे “आम्हाला आरक्षण दिलं तर सरकारचं गुलाल लावून आभार मानणार. कुणीही आडवं आलं तरी आम्ही मुंबईला जाणारच. माझा जीव गेला तरीही मी मुंबईत जाणारच. आझाद मैदानात बसून आरक्षणाची लढाई लढणार आणि यावेळी ओबीसीतून आरक्षण घेऊन परत येणार” अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी आपला निर्धार बोलून दाखविला आहे.
ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता 29 ऑगस्टला मुंबईत नेमके काय घडते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






