Marathi News

लाडकी बहिणच्या पैशांवरून महायुतीत ओढाताण; निधीची कमतरता…2100 रू. मिळणारच नाहीत?

Written by:Rohit Shinde
Published:
महायुतीत लाडकी बहिण योजनेच्या पैशांवरून चांगलंच रणकंदन सुरू आहे. निधी जुळवताना सरकारला नाकी नऊ येत असताना अंतर्गत वाद देखील समोर येत आहेत. त्यामुळे या योजनेचं भविष्य काय असा सवाल निर्माण झाला आहे...
लाडकी बहिणच्या पैशांवरून महायुतीत ओढाताण; निधीची कमतरता…2100 रू. मिळणारच नाहीत?

लाडकी बहिण योजना आणि राज्याची आर्थिक तिजोरी हे दोन सध्या राज्यभर परवलीचे शब्द ठरले आहेत, त्याची कारणेही तशीच आहेत. कारण एप्रिलचा हप्ता महिलांना देताना महायुती सरकारची चांगलीच ओढाताण झाली होती. आता मे महिन्याचा हप्ता कधी आणि 2100 रूपये कधी मिळणार असा सवाल महिलांमधून उपस्थित केला जात आहे. परंतु, या योजनेसाठी पैसे वळविल्याने महायुतीत एक वेगळाच अंतर्गत वाद सुरू झाला आहे, त्यामुळे या योजनेचा भविष्य नेमकं काय असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.

संजय शिरसाटांची आक्रमक भूमिका

ही योजना सरकारसाठी अडचण ठरू लागली आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला होता त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. “या खात्याचा निधी कायदेशीरपणे दुसरीकडे वळवता येत नाही, ना त्यात कपात करता येते. पण अर्थ खात्याकडून आपले डोके जास्त चालवले जात आहे,” अशी खरमरीत प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. “जर सरकारला सामाजिक न्याय विभागाची गरजच वाटत नसेल, तर ते खातेच बंद करा.” असेही त्यांनी म्हटले आहे. यावर हसन मुश्रीफांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे.

काय म्हटले हसन मुश्रीफ?

‘उपमुख्यमंत्री अजित दादा हे काय आकाशातून पैसे आणणार नाहीत किंवा हे पैसे काही अजित दादांनी घरी नेलेले नाही. पैसे देताना ओढाताण होते आहे हे साहजिक आहे. मात्र असे बोलणे बरोबर नाही. आपण सगळ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करत आहोत. त्यामुळे शिरसाठ यांनी बोलताना विचार करून बोलले पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली त्यामुळे सरकारला योजनेसाठी पैसे जुळवताना चांगलीच ओढाताण होत आहे, हे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच पुढचे हप्ते कसे येणार? 2100  रूपये कधी आणि कसे मिळणार असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews