देशभरातील पर्यटकांनी पुन्हा काश्मीरमध्ये यावे यासाठी प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
महाराष्ट्र शासन इथे जागा घेऊन सुसज्ज असे महाराष्ट्र भवन उभारणार असून, त्याद्वारे जास्तीत जास्त पर्यटकांचे पाय पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीरकडे वळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
देशभरातील पर्यटकांनी पुन्हा काश्मीरमध्ये यावे यासाठी प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

Eknath Shinde – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यावेळी घोडेवाला म्हणून काम करणाऱ्या सय्यद आदिल हुसैन शाहने याने जीवाची पर्वा न करता पर्यटकांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र दहशतवाद्यांनी त्यालाही गोळ्या घालून ठार केले. यानंतर आपण त्यांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत केली. यानंतर आज सय्यद आदिल हुसैन शाहच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

काश्मीरात महाराष्ट्र भवन उभारणार असून, त्याद्वारे जास्तीत जास्त पर्यटकांचे पाय पुन्हा एकदा जम्मू काश्मीरकडे वळतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

आदिलच्या कुटुंबियासोबत शिवसेना…

दरम्यान, शिवसेना आपल्या पाठीशी कायम उभी राहील असे शिंदेंकडून आदिलच्या कुटुंबियांना आश्वासन देण्यात आले. पर्यटकांचा जीव वाचवता वाचवता सय्यदचा जीव गेला. सय्यद कुटुंबातील कमावता हात कायमचा हिरावून घेतला गेला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, आपला मुलगा या हल्ल्यात गमावला असून, त्यापुढे केलेली ही मदत नगण्य आहे. ही मदत देऊन आपण देशवासीयांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. शिवसेना पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा असून, यापुढेही आपल्याला लागेल ती मदत नक्की करू असे शिंदे यांनी सांगितले.

पूर्वीसारखीच काश्मीरचे नंदनवन व्हावे…

या हल्ल्यानंतर काश्मीरमधील हॉटेलवाले, घोडेवाले, टुरिस्ट गाईड, छोटे मोठे दुकानदार यांना पुन्हा एकदा हक्काचा रोजगार मिळेल असे दिवस आणण्यासाठी सारे सोबत राहून पुन्हा प्रयत्न करू, असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. आदिलच्या कुटुंबियांना लागेल ती मदत करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू असे सांगून त्यांनी त्यांना आश्वस्त केले. तसेच या हल्ल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी केंद्र शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

देशभरातील पर्यटकांनी पुन्हा इथे यावे आणि ही जागा पुन्हा अधिसारखीच नंदनवन व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी आदिलचे आई वडील, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews