महाराष्ट्रात पावसाळ्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, भात, तूर आणि ऊस यांसारखी प्रमुख पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतीचे क्षेत्र पूर्णपणे जलमय झाले आहे. यामुळे उत्पादन घटण्याची भीती आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
सरकारकडून पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतीवर गंभीर परिणाम होत असून शेतकरी संकटात सापडले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना मदत व संरक्षण योजनांची तातडीने गरज आहे. अशा परिस्थितीत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी या संदर्भात मोठी माहिती दिली आहे.
‘लवकरच पंचनामे आणि नुकसान भरपाई’
राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणालेत. राज्यातील जून, जुलै महिन्यातील नुकसानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाल्याचं ते यावेळी म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरात दाणादाण उडाली आहे . शेतकऱ्यांची पिक डोळ्यासमोर उद्वस्त झाली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय . अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे .कर्जमाफी, नुकसान भरपाईवरून विरोधक आक्रमक होत असताना सरकारवर दबाव वाढतोय .
शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना मोठा फटका बसला असून डोळ्यासमोर पिकांचा चिखल झाल्याने शेतकरी हतबल झालाय .कृषिमंत्र्यांनी सांगितलं की, “राज्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंचनाम्यानंतर उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील लवकरच मदत मिळणार आहे.”
राज्यात युरीयाचा तुटवडा; अडचणी वाढल्या!
युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. पिकांच्या वाढीसाठी युरिया हा सर्वात महत्त्वाचा रासायनिक खत म्हणून वापरला जातो. पिकांना आवश्यक असलेले पोषण न मिळाल्यास त्यांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात आणि उत्पादन घटते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. काही वेळा पिके पूर्णपणे नष्ट होण्याचीही शक्यता असते. अशा परिस्थितीत राज्यातील युरीया तुटवड्यावर देखील देखील कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी भाष्य केलं आहे.
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांसाठी युरियाच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचंही भरणे यांनी सांगितलं. त्यांनी आश्वासन दिलं की, यासंदर्भात लवकरच शेतकऱ्यांना “गुड न्यूज” दिली जाईल.असं कृषिमंत्री भरणे म्हणालेत.त्यामुळे आगामी काही दिवसांत या स्थितीत नेमका कसा आणि काय बदल होतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






