Marathi News

‘कृषिमंत्री म्हणजे ओसाड गावची पाटीलकी’; माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले!

Written by:Rohit Shinde
Published:
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा अडचणीत आले आहेत. आता कोकाटेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नेमकं काय म्हटलंय पाहूयात...
‘कृषिमंत्री म्हणजे ओसाड गावची पाटीलकी’; माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले!

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सतत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. अशा परिस्थितीत आता माणिकराव कोकाटेंनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे कोकाटे आपल्या पदाची किंमत नाही का? की त्यांना पद नको? असे सवाल आता निर्माण झाले आहेत. नेमकं माणिकराव कोकाटेंनी काय म्हटलं? वादाचा आजवरचा इतिहास काय? जाणून घेऊ…

‘कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी’

अवकाळी पावसामुळे  शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी आता मदतीच्या आशेने सरकारकडे पाहत आहेत. शुक्रवारी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा संभाजीनगरमध्ये पाहणी दौरा होता. यावेळी ‘कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे’, असे विधान माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी केले. यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका सुरू आहे. दरम्यानच्या काळात सिन्नर तालुका दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना त्यांनी “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

तो मी नव्हेच, कोकाटेंचं स्पष्टीकरण

त्यामुळे आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विरोधकांच्या चांगलेच रडावर आले आहेत. “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. “मी असं काही बोललोच नाही,” असं स्पष्टीकरण कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे. आता कोकाटेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते आगामी काळात चांगलेच अडचणीत येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पदाची किंमत नाही?, विरोधकांचा सवाल

वादग्रस्त आणि आपल्या खात्याशी संबंधित आक्षेपार्ह विधान करणे हे कोकाटेंसाठी नवीन नाही. त्यात आता ‘कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी ‘ हे विधान कोकाटेंना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे. आगामी काळात विरोधक कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही मागणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय कोकाटे यांना आपल्याकडे असणाऱ्या कृषीखात्याची किंमत नाही का? असा सवाल देखील आता विरोधक उपस्थित करताना दिसत आहे, या प्रकरणात आता पुढे काय होतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews