मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील उपोषणाचा आज चौथा दिवस; जरांगेंचा ‘तो’ प्रस्ताव सरकारने मान्य केल्यास आरक्षण मिळणार?

Written by:Rohit Shinde
Published:
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आझाद मैदानातील उपोषणाचा खरंतर आज चौथा दिवस आहे. त्यामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. सरकार हा प्रश्न आज निकाल काढणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील उपोषणाचा आज चौथा दिवस; जरांगेंचा ‘तो’ प्रस्ताव सरकारने मान्य केल्यास आरक्षण मिळणार?

आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जरांगेंनी आजपासून पाणी न पिण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. तर मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी काल रात्री उशीरा बैठक झाली. या बैठकीत नेमकी कार्य चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मुंबईत आज काही मोठ्या घडामोडी घडतात का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मनोज जरांगेंचा ‘तो’ प्रस्ताव सरकार मान्य करेल?

“सरकारने 13 महिन्यांपूर्वी कागदपत्र घेतली असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सातारा संस्थानचे आणि हैदराबाद संस्थानचे गॅझेटियरमध्ये संपूर्ण मराठवाडा बसतो असं ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर सातारा संस्थानाचे गाझेटियर मराठवाड्यातला मराठा कुणबी असल्याचं सांगतो असं जरांगे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सरकारला अडथळा असणे शक्य नाही असंही जरांगे म्हणाले. 58 लाख नोंदी आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, ज्यांच्या नाही सापडल्या त्यांची पोट जात घ्या आणि अध्यादेश काढा असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. कुणबी ही उपजात आहे हेच कायदा सांगतो. ओबीसी पात्र करायचं असेल तर पोटजात उपजात म्हणून मराठा कुणबी म्हणून घ्या. सरसकट म्हणायची गरज नाही असंही ते म्हणाले. त्यामुळे आता आगामी काळात जरांगेंनी मांडलेला हा प्रस्ताव सरकार मान्य करते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या

  • मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, ही मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे.
  • हैदराबाद गझेटियर, सातारा गॅझेटीयर, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आले आहेत.
  • सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे आरक्षणात घेण्याची मागणी.
  •  सरसकट गुन्हे मागे घेणार होते. त्यासंदर्भात आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
  • ओबीसी कोट्यातून कायद्याच्या चौकटीत टीकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळावे.

सरकारच्या वेगवान हालचाली; तोडगा निघणार?

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठकांचे सत्र होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यात बैठक होणार आहे. सकाळी ११ वाजता वर्षा निवासस्थानी खलबतं होतील. मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास न्यायालयाच्या निकालांचा अडसर, त्यावर जरांगेंनी सरसकट वगळा ही केलेली मागणी विचारात घेतली जाईल. अशात, सरकारकडून कायदेशीर सल्लामसलत काढण्यासाठी खलबतं होत आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews