आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जात मनोज जरांगे पाटलांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. सुप्रिया सुळे यांना घेरण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून करण्यात आला. मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आझाद मैदानातून बाहेर पडत होत्या. यावेळी त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. यावेळी काही आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. एका आंदोलकाने तर शरद पवार यांनी मराठ्यांचे वाटोळे केले आहे, असा आरोप केला. यावर आता जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.
नेमके काय म्हणाले जरांगे?
“कोणताही नेता आला तर त्यांना त्रास देऊ नका, तो आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायला शिका. अन्यथा, आपल्याकडे नेते यायला भेतील. नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालत असाल तर तुमच्याकडे कोणीही येणार नाही. जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत नेत्यांचा सन्मान करा. ज्यावेळेस असं वाटेल की, आरक्षण भेटत नाही, त्यावेळेस पाहू काय करायचं आहे ते.”
“कोणत्याही पक्षाचा नेता आला तर त्याला माघारी बोलू नका, त्याला सन्मानाने येऊद्या आणि सन्मानाने जाऊ द्या. गोंधळ घालणारे कोण आहेत ते पहावं लागेल. ते सरकारने पाठवलेले आहेत का? माझे लोक असं करत नाहीत, ते सरकारचेच असू शकतात. त्यांना दंगल घडवायची आहे. त्यामुळे पोरांनी सावध रहायला हवं” असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. त्यामुळे मनोज जरांगेंनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.
सरकारच्या हालचाली वाढल्या!
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठा आरक्षणासंदर्भाती मंत्रिमंडळ उपसमितीमधील प्रमुखांची आज महाराष्ट्राच्या महाअधिवक्तांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर वेगवान घडामोडी घडताना दिसून येत आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीकडून आज रात्रीतूनच प्रस्ताव तयार केला जाणार आहे, प्रस्ताव तयार केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिल्यानंतर मनोज जरांगेंना शिंदे समिती पु्न्हा भेटणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता सरकारकडून तोडगा काढला जाण्याची शक्यता दिसून येत आहे.






