केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आरक्षणावरुन सर्वात महत्त्वाचे विधान केले आहे. ‘मी ब्राह्मण आहे, परमेश्वराने आमच्यावर सर्वात मोठे उपकार केले ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही,’ असे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जोरदार संघर्ष पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पाहायला मिळत आहे. अशा वातावरणात नितीन गडकरींनी हे विधान केल्याने त्याला महत्व आले आहे.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
“मी ब्राह्मण समाजाचा असून आमच्यावर परमेश्वराने सर्वात जास्त काय उपकार केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही” असं नागपूर येथील हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “मी ब्राह्मण जातीचा आहे. आमच्यावर परमेश्वराने सर्वात जास्त काय उपकार केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात ब्राह्मणांना जास्त महत्व नाही. पण उत्तर प्रदेशात, बिहारमध्ये ब्राह्मणांना खूप महत्व आहे. मी तिकडे जातो तेव्हा दुबे, त्रिपाठी, मिश्रा या ब्राह्मण समुदायाचं राज्य पॉवरफूल आहे. जसं इकडे मराठा जातीचे महत्व आहे तसं तिकडे ब्राह्मण समाजाचे महत्व आहे.”
“कोणताही माणूस जात, पंथ, धर्म आणि लिंग यापैकी कोणत्याही घटकामुळे मोठा होत नाही, तर तो गुणांमुळे मोठा होतो. समाजात ज्यांची मुलंबाळं चांगली शिकली आहे त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे.” असं या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
गडकरींचा नेमका उद्देश्य काय?
राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जोरदार संघर्ष पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पाहायला मिळत आहे. दुसरीकडे बंजारा, वंजारा समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आरक्षणावरुन सर्वात महत्त्वाचे विधान केले आहे. यामध्ये वरील विधानातून गडकरींना नेमका समाजाला काय संदेश द्यायचा आहे अशा आशयाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र आरक्षणाच्या पलीकडे जाऊन प्रगती साधता येऊ शकते, असे गडकरी अप्रत्यक्षपणे सांगत आहेत, असा काहींचा अंदाज आहे.






