Marathi News

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यावरून आरोप प्रत्यारोप; नेमकं काय घडलं?

Written by:Rohit Shinde
Published:
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर अक्कलकोटमध्ये हल्ला झाला. त्यांच्यावर शाईफेक करत तोंडाला काळे फासण्यात आले. त्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यावरून आरोप प्रत्यारोप; नेमकं काय घडलं?

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर अक्कलकोटमध्ये हल्ला झाला. त्यांच्यावर शाईफेक करत तोंडाला काळे फासण्यात आले. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याचा आरोप करत हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून घटनेच्या निषेधार्थ पंढरपुरात प्रवीण गायकवाडांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. मात्रा आता त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना चांगलाच जोर आला आहे.

राजकीय पाठिंब्याने हल्ला -प्रविण गायकवाड

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांना रविवारी अक्कलकोट येथे शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. या घटनेवर प्रतिक्रिया देताना गायकवाड आपल्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा प्रवीण गायकवाडांचा आरोप आहे. त्यांचा थेट रोख भाजप आणि आरएसएसकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. शाईफेकीनंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची गायकवाडांशी फोनवरुन चर्चा केली. तर भाजपने पेरलेल्या विषाला उकळी फुटली, अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला.

हल्ल्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

या हल्ल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर गंभीर आरोप केला होता. प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे. तो चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळले आहेत.

“काटेकडे आधी पिस्तुल सापडलं.  त्याच्याकडे 28 काडतुसे सापडली. प्रवीण गायकवाड लढणारे आहेत, ते घाबरणारे नाहीत. ते बाजूला जाऊन थांबले. परंतु, काटे हा प्रवीण गायकवाड यांना पुन्हा घेऊन आला. काटे याच्याकडे बंदूक होती, अशी देखील माहिती मिळाली. कुठेतरी गायकवाड यांना मारण्याचा प्रयत्न होता. त्याने स्वतःच्या भावाला देखील सोडलं नाही, त्याला देखील मारलं आहे,} असा आरोप यावेळी रोहित पवार यांनी केला.

पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू

या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित ‘शिवधर्म फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दीपक काटे(भाजप युवा मोर्चा – राज्य सचिव), किरण साळुंखे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण सात जणांविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापैकी दोन आरोपींना अटक केली असून पाच आरोपी सध्या फरार आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews