विधानभवनाच्या प्रांगणामध्येच काल अभूतपूर्व असा राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांचा सराईत गुन्हेगार असलेला गावगुंड कार्यकर्ता ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेनंतर आता मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी या घटनेवर आता तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. नेमके राज ठाकरे काय म्हणालेत, पाहूयात…
‘काय अवस्था झाली महाराष्ट्राची?’
कालच्या घटनेवर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला,’ काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?’सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, ‘कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?’
अशा लोकांना माफ करू नका -राज ठाकरे
राज ठाकरे संतापून या विषयावर भाष्य करताना म्हणतात की, ‘एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये… सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही !’
काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ‘ काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?’
सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 18, 2025
प्रकरणात काय कारवाई होणार?
आमदार जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याच्यावर हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा दावा करण्यात येत आहे. आमदार गोपीचंद पडळकरांचा हा कार्यकर्ता अट्टल गुन्हेगार असल्याचे त्याच्या गुन्हेगारी इतिहासावरून दिसत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले याच्यावर सांगली, आटपाडी भागात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. खुनी हल्ला, मारामारी, विनयभंग असे अनेक आरोप त्या कार्यकर्त्यावर आहेत. त्यामुळे या प्रकरणात काही कारवाई होते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






