काका-पुतण्याच्या तासभराच्या भेटीने राज्यात संभ्रम; नेमकं काय घडलं, काय ठरलंय?

Written by:Rohit Shinde
Published:
पवार काका-पुतण्याच्या तासभराच्या भेटीमुळे राज्यातील जनतेमध्ये आणि काही नेत्यांमध्ये सध्या कमालीचा संभ्रम पाहायला मिळतोय. या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काका-पुतण्याच्या तासभराच्या भेटीने राज्यात संभ्रम; नेमकं काय घडलं, काय ठरलंय?

दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मुंबईत महत्त्वाची घटना घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका अर्थात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार याांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, ही भेट सुमारे एक तास चालली, आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले. राज्यात सध्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

काका-पुतण्याच्या भेटीत काय चर्चा?

राष्ट्रवादीमध्ये उभी फुटल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली आहे.  या भेटीबाबत समोर येणाऱ्या माहितीनुसार, मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ही भेट झालेली आहे. काका-पुतण्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झालेली आहे. या भेटीचे नेमके कारण काय असावे? असे विचारले जात आहे. असे असतानाच ही भेट माळेगाव सहकारी साखर कारखान्याविषयी होती, राज्यातील पूरस्थितीवरही चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे, अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेणे ही आता नवीन गोष्ट राहिली नाही. अलीकडेच जानेवारी महिन्यात  शरद पवार आणि अजित पवार बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार काका पुतणे एकत्र आले होते. यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, अशी चर्चा सुरू झाली होती.  त्यामुळे काका-पुतण्याचं नेमकं काय ठरलंय, असा प्रश्न देखील अनेकदा उपस्थित केला जातो.

भेटीचा हेतू राजकीय नसल्याचा दावा

राज्याच्या हिताच्या दृष्टीने किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये शरद पवार आणि अजित पवार सुद्धा आहेत त्या संस्थांच्या संबंधित काही चर्चा असू शकते. मात्र, या भेटीतून राजकीय अर्थ काढण्याचं काहीही कारण नाही. असं काही राजकीय जाणकार आणि पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. यापूर्वीही काका-पुतणे काही बैठकांसाठी एकत्र दिसले होते. परिणामी एकत्रिकरणाच्या या चर्चांना जास्तच बळ मिळाले होते. नंतर मात्र एकत्रिकरणाची ही चर्चा मागे पडली होती. आता पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार यांच्यात एक तास चर्चा झाली आहे. त्यामुळे अनेक अंदाज बांधले जात आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews