सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मंगळवारी २२ जुलै रोजी दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे. या पत्रकार परिषदेत त्या सूरज चव्हाण यांच्या तातडीने अटकेची मागणी करणार आहेत. त्याचबरोबर, संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्याची मागणी करत याविरोधात लढा उभारण्याची घोषणाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विवादीत मंत्री, आमदार, पदाधिकारी टार्गेटवर
सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांचे व्हिडीओ समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड यांचा कॅटीन कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडताना दिसत आहे. रम्मी मास्टर कृषीमंत्री, शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी, असा टोला विरोधकांकडून लगावला जात आहे.
आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीसांकडे एक मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस आता तरी ही गुंडगिरी थांबवा, अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे. अंजली दमानिया अशा मंत्री आणि आमदारांची हकालपट्टी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, या काळात सुरज चव्हाण यांच्या अटकेची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
मी मंगळवारी पहाटे मुंबईला परत येणार आहे. मंगळवारी दुपारी १२ मी पत्रकार परिषद घेऊन, सूरज चव्हाण यांची अटक, संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे, योगेश कदम यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यासाठी मी लढा उभारण्याची घोषणा करणार आहे.
आता ही गुंडगिरी बास
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) July 20, 2025
विवादीत मंत्र्यांबाबत राऊतांचा दावा काय?
राज्याच्या महायुती सरकारमधील मंत्र्यांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे. असं खासदार संजय राऊतांनी म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राऊत म्हणतात की, ” मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे. यासंदर्भात माझ्याकडे माहिती आहे. शेतकऱ्यांना भेटायला कृषिमंत्र्यांना वेळ नाही. पण ऑनलाइन गेम खेळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. छत्तीसगडमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई झाली तशी आपल्याकडे होत नाही.”






