हिंदी सक्तीच्या संदर्भातील जीआर सरकारने मागे घेतल्यानंतर मुंबईत ठाकरे बंधुंनी एकत्रित येत विजयी सभा घेतली. सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेशी संबंधित आणि भाषणातील काही महत्वाच्या हायलाईट्स जाणून घेऊयात…

18 वर्षांनतर ठाकरे बंधू एका मंचावर

महायुती सरकारचा हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यानंतर मराठीचा विजयी मेळावा साजरा करण्यासाठी तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधूंना एकत्र एका व्यासपीठावर पाहता आले. आज मुंबईतील वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला.  राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य मराठी माणूस मुंबईत दाखल झाला होता. वरळी डोम परिसराच यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळाली.

दोन्ही ठाकरेंचे फडणवीसांवर टीकास्त्र

विजयी सभेतील भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. “आम्ही देवेंद्र फडणवीसांमुळे एकत्र आलो. इतर कोणतेही मुद्दे आम्हाला एकत्र आणू शकले नव्हते.” असं राज ठाकरेंनी म्हटले. शिवाय, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी महायुती सरकार आणि केंद्र सरकारला घेरलं. महाराष्ट्र आणि मराठीवरील अन्याय कदापी सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

‘ आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आज आपल्या भाषणाची सुरूवात केली. त्यामुळे आगामी काळात ठाकरेंची शिवसेना-मनसे एकत्रित वाटचाल करतील असे संकेत मिळाले. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ठाकरेंच्या राजकीय एकत्रित येण्याला हवा मिळाली.  यावेळी आक्रमक भाषण करताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘अणाजी पंत’ असा उल्लेख केला.

‘कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा’

यावेळी ‘कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा’ अशी घोषणा देखील राज ठाकरेंनी दिली. त्यामुळे हिंदी सक्ती विरोधातील आंदोलन वगळता
ठाकरे बंधुंची पुढची भूमिका काय हे महत्वाचं ठरते. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यावर भाष्य केले. जेव्हा-जेव्हा मराठी माणूस आणि महाराष्ट्रावर अन्याय होईल, तेव्हा असेच उभे राहू, असे राज ठाकरे म्हटले. “मराठी माणसाला जाती-पातीच्या मुद्द्यावर विभागण्याचा प्रयत्न आगामी काळात होऊ शकतो, सावध रहा” असं आवाहन राज ठाकरेंनी उपस्थितांना केले.