‘राज ठाकरे यांचे आभार मानतो’, ठाकरे बंधूंच्या सभेनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

Written by:Smita Gangurde
Published:
मुंबई महापालिका 25 वर्ष ठाकरेंच्या ताब्यात होती. त्या काळात मुंबईत एकही दाखवण्यासारखं काम ते करु शकले नाहीत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केलीय
‘राज ठाकरे यांचे आभार मानतो’, ठाकरे बंधूंच्या सभेनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

मुंबई- उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू 20 वर्षांनंतर पहिल्यांदा एका व्यासपीठावर दिसले. पहिलीपासून हिंदी विरोधातला लढा यशस्वी झाल्यानंतर विजयी मेळाव्याच्या निमित्तानं हे साधलं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जे साधलं नाही, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवलं अशी उपरोधिक टीका केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात उत्तर दिलं.

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादच आपल्याला मिळतील, अशी उपरोधिक प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर दिलीय. राज ठाकरे यांचे आभार मानतो, त्यांनी दोन भाऊ एकत्र आणण्याचे श्रेय आपल्याला दिले असंही पुढे फडणवीस म्हणाले आहेत.

विजयी मेळाव्यात मराठीचा उल्लेख नाही-फडणवीस

मुंबईत ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरेंनीही टीका केली. अनाजीपंतांमुळे आम्हा दोन्ही बंधूंमधला अंतरपाट दूर झाला असं सांगत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली. यावर बोलताना फडणवीस यांनी विजयी मेळाव्यात रुदालीचे दर्शन घडले अशी टीका केली आहे. मराठीच्या विजयी मेळाव्यात मराठीबाबत एक शब्दही बोलण्यात आला नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केलीय. आमचे सरकार पाडले, सरकारमध्ये निवडून द्या, असं सभेत म्हटलं गेल्याचं फडणवीस म्हणालेत.

पब्लिक सब जानती है- फडणवीस

मुंबई महापालिका 25 वर्ष ठाकरेंच्या ताब्यात होती. त्या काळात मुंबईत एकही दाखवण्यासारखं काम ते करु शकले नाहीत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केलीय. ठाकरेंच्या काळात मुंबईतील मराठी माणूस हद्दपार झाला. उलट महायुती सरकारनं बीडीडी चाळ, पत्राचाळ, अभ्युदय नगरमधील मराठी माणसांना हक्काची घरं मिळवून दिल्याचंही ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महायुतीनं मुंबईचा चेहरा मोहरा बदलला, याची असूया ठाकरेंच्या मनात असल्याची टीकाही फडणवीसांनी केली.

ये पब्लिक है सब जानती है, असं सांगत मुंबईतील मराठी आणि अमराठी भाजपासोबत असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे त्यासोबतच आम्ही हिंदूही आहोत, त्याचाही आपल्याला अभिमान असल्याचं फडणवीस म्हणाले. भाजपातचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणार असल्याची प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

 

Follow Us :GoogleNews