मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाचा आज तिसरा दिवस; मुंबईत नेमक्या काय घडामोडी? आरक्षणाचं काय होणार?

Written by:Rohit Shinde
Published:
मनोज जरांगे-पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. त्यामुळे मुंबईत आज नेमक्या काय घडामोडी घडतात, याकडे खरंतर अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे. मराठा आरक्षणाचं काय होणार, असा प्रश्न आंदोलकांना पडलेला आहे.
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाचा आज तिसरा दिवस; मुंबईत नेमक्या काय घडामोडी? आरक्षणाचं काय होणार?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर तीन दिवसांपासून उपोषण सुरु आहे. आता मनोज जरांगेंनी टोकाचा निर्णय घेतला आहे.  उपोषणासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. उद्यापासून पाणी पिणं बंद करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.  दुसरीकडे मराठा बांधवांतील रोष देखील काहीसा वाढताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडणार, आरक्षणाचं काय होणार हे पाहणे यानिमित्ताने महत्वाचे ठरणार आहे.

मराठा समाजाचा 70 वर्षांचा लढा

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 70 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण असून ते दिलं गेलं नाही. आरक्षणाची लेकरांची वेदना आहे. गरीब लोक हे मुंबईला आले आहेत. सगळ्या जातींचे लोक गोरगरीब मराठा समाजाची सेवा करत आहेत. राज्यातील गोरगरीब मराठा जर मुंबईत येत असतील तर आपली गाडी ग्राउंडला लावा आणि रेल्वेने आझाद मैदानला या. तुमच्या गाड्या सुरक्षित राहतील, असे आवाहन त्यांनी मराठ्यांना केले आहे. मराठा समाज बांधव देखील मनोज जरांगेंच्या आवाहनाला अत्यंत चांगला प्रतिसाद देत असल्याचे चित्र आहे.

भाजपाच्या नेत्यांचा मागणीला विरोध

ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणासाठी मराठे थेट मुंबईत धडकले. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलक पाऊस, उपवास, झोपेची पर्वा न करता लढा देत आहेत. आझाद मैदानापासून ते वाशीपर्यंत मराठा आंदोलक पसरले आहेत. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यातच आता भाजपमधून या आंदोलनावर थेट प्रहार सुरू झाले आहेत. आमदार संजय केनेकर, मंत्री निलेश राणे आणि इतर भाजप नेत्यांनी त्यांचा रोख स्पष्ट केला आहे. त्यात आता या बड्या भाजप नेत्याने तर थेट हल्लाबोल केला आहे. त्यामुळे भाजपा आणि मनोज जरांगे यांच्यातील संघर्ष आता चांगलाच वाढताना दिसत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या

  • मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, ही मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे.
  • हैदराबाद गझेटियर, सातारा गॅझेटीयर, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आले आहेत.
  • सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे आरक्षणात घेण्याची मागणी.
  •  सरसकट गुन्हे मागे घेणार होते. त्यासंदर्भात आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
  • ओबीसी कोट्यातून कायद्याच्या चौकटीत टीकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळावे.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews