मागील काही महिन्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही ठाकरेंचे मनोमिलन झाले आहे. एकेकाळी एकमेकांचे कट्टर वैरी असणारे हे ठाकरे बंधू सर्वप्रथम मराठी भाषेनिमित्त एकत्र आले होते. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी या वाढतच गेल्या. मधल्या काळात राज ठाकरे तब्बल तीन वेळा मातोश्रीवर गेले तर उद्धवही गणपतीच्या निमित्ताने राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पोचले होते. ठाकरे बंधूंच्या या भेटीगाठी या कौटुंबिक असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं. मात्र आता दोन्ही ठाकरेंचे हे मनोमिलन राजकीय पटलावर (Uddhav Thackeray MNS Dipotsav) पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे मनसेच्या यंदाच्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
कधी आहे मनसेचा दीपोत्सव??Uddhav Thackeray At MNS Dipotsav
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी शिवाजी पार्क वर दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा दीपोत्सवाचं १३ वं वर्ष आहे. १७ ऑक्टोबरला संध्याकाळी साडे सहा वाजता या दीपोत्सवाचं उद्घाटन होईल. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. विशेष बाब म्हणजे मनसेच्या यंदाच्या दीपोत्सवाचे उद्घाटन चक्क उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे (Uddhav Thackeray At MNS Dipotsav). मनसेच्या निमंत्रण पत्रिकेत यंदा प्रथमच उद्धव ठाकरेंचं नाव पाहायला मिळत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा करण्यात आला आहे. यामुळे एकनाथ शिंदेंना ही गोष्ट चांगलीच झोंबेल हे मात्र नक्की… यापूर्वी सुद्धा राज ठाकरेंनी २७ जुलैला उद्धव ठाकरेंची त्यांच्या मातोश्री बंगल्यावर जाऊन भेट घेतली तेव्हाही उद्धव ठाकरेंचा उल्लेख त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख असाच केला होता.
महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र??
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. केवळ, औपचारीत घोषणा आणि जागावाटप बाकी असल्याचा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. फक्त ठाकरे बंधूच नव्हे तर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांचेही मनोमिलन झाले आहे. ठाकरे गटाचे फायदे नेते खासदार संजय राऊत हे सुद्धा ठाकरे बंधूंच्या यूतीबाबत सकारात्मक बातम्या पत्रकारांना देत असतात. मुंबईसह एकूण पाच महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होईल असं संजय राऊतांनी आधीच जाहीर करून टाकले आहे.






