राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी (Uddhav Thackeray Meet Raj Thackeray) शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत आणि अनिल परब हे सुद्धा उपस्थित आहेत. मागील अर्ध्या तासापासून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये बैठक सुरू आहे. कौटुंबिक भेटीनंतर प्रथमच आज दोन्ही ठाकरेंमध्ये थेट राजकीय चर्चेला सुरुवात झालेली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
ठाकरे बंधूंची जवळीक वाढली – Uddhav Thackeray Meet Raj Thackeray
खरंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळील मागच्या काही महिन्यापासून चांगलीच वाढलेली आहे. मराठी भाषेसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू नंतर राजकीय युतीसाठी ही सकारात्मक दिसले. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते, त्यानंतर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे सुद्धा प्रथमच राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर गेले होते. आता आज कोणाच्याही ध्यानीमनी नसताना उद्धव ठाकरे यांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. या भेटीमुळे राजकीय तर तर्क वितर्क लढवले जात आहेत.
ठाकरे बंधूंसाठी मुंबई महापालिका महत्त्वाची –
मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे बद्दल साठी प्रतिष्ठेची असणार आहे. राज्याच्या राजकारणात आपलं महत्त्व टिकवून ठेवायचं असेल तर मुंबई महापालिकेतील सत्ता कायम राखण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या समोर असेल. अशावेळी मराठी मतांची विभागणी होऊ नये यासाठी दोन्ही ठाकरे बंधू प्रयत्नशील आहेत. याच पार्श्वभूमीवर आजची भेट (Uddhav Thackeray Meet Raj Thackeray) ही जागा वाटपा संदर्भात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) महाविकास आघाडीत घेण्याविषयी चर्चा झाली होती. त्यावर काँग्रेस पक्षाने सावध भूमिका घेतली होती. याविषयी आम्ही दिल्लीतील हायकमांडला विचारु, असे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे.






