हिंदीच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं होतं, पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका अनेक संघटना आणि पक्षाची होती. याच मुद्द्यावर मनसेनं मोठं आंदोलन उभारलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली. अखेर सरकारनं त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर मागे घेतले. त त्यानंतर ठाकरे बंधुंनी एकत्रित येत विजयी मेळावा घेतला. त्यानंतर त्यांच्या युतीच्या चर्चेने जोर धरला. परंतु युती होणार की नाही? असा संभ्रम राज्यातील जनतेच्या मनात कायम असल्याचे चित्र आहे. राज ठाकरेंनी देखील युतीबाबत सावधगिरीची भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.
निवडणुकीच्या काळात युतीचा निर्णय -उद्धव ठाकरे
“वीस वर्षांनंतर आम्ही पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलो, पहिल्यांदा मराठीच्या विषयावर एकत्र आलेलो आहोत. मी तेव्हाच सांगितलं आहे की आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी, त्यामुळे आम्ही मराठीच्या विषयावर एकत्र राहणारच. मुद्दा पुढे येतो तो राजकारणाचा आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाहीये, ज्यावेळी निवडणूक जाहीर होईल त्यावेळी आम्ही त्यावर चर्चा करू,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला. कोणत्याही भाषेची सक्ती आम्ही लागू करू देणार नाही, याचा अर्थ असा होत नाही की आम्ही एखाद्या भाषेला विरोध करतोय असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
युतीबाबत मनसे प्रमुख राज ठाकरेंची सावध भूमिका
दुसरीकडे मात्र राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना युतीच्या विषयावर सबुरीचा सल्ला दिला असल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेच्या शिबिरात देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं होतं, आम्ही मराठीसाठी एकत्र आलो होतो, तो विषय तेवढ्यापुरताच मर्यादीत आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. आजच्या सभेत राज ठाकरे हे काय भूमिका मांडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव आणि राज ठाकरे बंधूंची मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती होणार की नाही? याबाबत सस्पेन्स वाढलाय. नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान राजकीय परिस्थिती बघूनच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलीय. तर दुसरीकडे वाढदिवसानिमित्त सामनाला दिलेल्या मुलाखतीत आता राजही सोबत आल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी युतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे युतीबाबत अंतिम निर्णय व्हायला आणखी काही वेळ लागणार हे मात्र या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.






