पंकजा मुंडेंचा मेळावा वेगळ्याचं कारणाने गाजला; वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले, पंकजा मुंडेंवर टीकेची झोड

Written by:Rohit Shinde
Published:
पंकजा मुंडेंचा या दसरा मेळाव्यात आलेल्या समर्थकांकडून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक आणि आरोपी वाल्मिक कराड यांचे फोटो, पोस्टर झळकले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
पंकजा मुंडेंचा मेळावा वेगळ्याचं कारणाने गाजला; वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले, पंकजा मुंडेंवर टीकेची झोड

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा वंचित, सोशितांचा मेळावा म्हणून ओळखला जातो. मात्र, पंकजा मुंडेंचा या दसरा मेळाव्यात आलेल्या समर्थकांकडून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक आणि आरोपी वाल्मिक कराड यांचे फोटो, पोस्टर झळकले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.  पंकजा मुंडेंवर देखील यानिमित्ताने टीका होताना दिसत आहे.

वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले…

We Support Anna, कराड आमचे दैवत… अशा आशयाचे पोस्टर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात झळकले आहेत. वाल्मिक कराड हा केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे. या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान या घटनेवर पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणातून उत्तर दिले.

धिंगाणा करणारे आपले नाहीत -मुंडे

“मेळाव्याला राज्यभरातून लोक येतात. झाडावर टॉवर बसलेले लोक स्वत: आले आहेत. मी तुम्हाला आणलं का? तुम्ही स्वत: आला असाल तर तोंडं बंद करा. माझ्या दसऱ्या मेळाव्यात पूर्ण राज्यातून लोक येत आहेत. दरवर्षी येतात. पण मागच्या वर्षीपासून असं हलके वागणारे लोक का येत आहेत? ” असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. “तुमची भगवान बाबांवर श्रद्धा आहे. असं धिंगाणा करणारे लोकं माझे असू शकत नाही. आज माझ्यासाठी, माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाचं हृदयातून स्वागत करते. हा फाटक्या माणसाचा मेळावा आहे,” असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

यादरम्यान पंकजा मुंडे यांनी शायरीतून आपल्या भावना व्यक्त करत म्हणाल्या की, “विरासत में संघर्ष मिला है, तो जिद भी मिली है लडने की, चाहे जो भी हो, दटकर आगे बढने की, बदलू मै क्यों मै विचारोंकी अटल चोटी हूँ, मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ…,” असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

अंजली दमानियांनी पंकजांना घेरलं!

अंजली दमानिया यांनी या संदर्भात पंकजा मुंडे यांना थेट प्रश्न विचारले गेले पाहिजेत, असं म्हटलं आहे. वाल्मिक कराड यांच्याबद्दल त्यांचं वैयक्तिक मत काय आहे? या सवालाचं उत्तर पंकजा मुंडे यांनी द्यायला हवं. धनंजय मुंडेंना काही विचारून काही उपयोग नाही, कारण ती तर ‘गॉन केस’ आहे, अशा शब्दात अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आजच्या या मेळाव्यात पंकजा मुंडेंनी आक्रमक भाषण केले. शिवाय माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. प्रीतम मुंडे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews