Devendra Fadnavis – नागरी भागात पाणीपुरवठा, मलनिःसारण, हरित उद्याने व सरोवर पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र शासनाकडून अमृत अभियानांतर्गत निधी देण्यात येत आहे. नागरी भागात जनसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून त्यांचे जीवन सुसह्य करण्याची क्षमता या अभियानात आहे. तसेच आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यक क्षेत्रात उपलब्ध मनुष्यबळ आणि भविष्यात लागणारे मनुष्यबळाचा अभ्यास करावा. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज त्यांनी अमृत २.० अभियानाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार प्रयत्नशील
दरम्यान, केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र कुठेही मागे पडणार नाही, याबाबत यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना, उपक्रम व अभियानांची अंमलबजावणी करीत असते. या सर्वांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. यंत्रणांनी योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे, तसेच प्रकल्प पूर्णत्वातील विलंब टाळण्यासाठी प्रकल्प होऊ घातलेल्या जागेच्या परवानग्या प्राप्त करून घ्याव्यात. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ ची कामे मार्गी लावावीत
नागरी भागातील नागरिकांना दर्जेदार व आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ ची कामे पूर्ण करावीत. यंत्रणांनी मिशन मोडवर या अभियानांतर्गत प्रलंबित असलेली सर्व कामे ३१ मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करावीत. अभियानांतर्गत प्रलंबित असलेल्या प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात याव्यात. तसेच नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेंकडून त्यांचा सहभाग उपलब्ध करुन द्यावा. विविध विभाग, यंत्रणांकडून काम सुरू करण्यासाठी संबंधित परवानगी आगाऊ स्वरूपात दिल्यास काम तातडीने सुरू होऊ शकते. आरोग्य क्षेत्रात तातडीने मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.





