टीम इंडियाने आधीच फायनलचे तिकिट पक्के केलेले असताना आता फायनलबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बांग्लादेशला धुळ चारत पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे आता आशिया कपची फायनल हाय-व्होल्टेज होणार आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडणार आहेत. 28 तारखेला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.
पाकिस्तान फायनलमध्ये दाखल
आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर-4 फेरीच्या पाचव्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर 11 धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 गडी गमावून 135 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ 20 षटकांत 9 बाद 124 धावांपर्यंतच मजल मारू शकला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शेवटपर्यंत अचूक मारा करत बांगलादेशला लक्ष्य गाठू दिले नाही.
टॉस जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून मोहम्मद हारीसने सर्वाधिक 31 धावा केल्या. मोहम्मद नवाझने 25, तर कर्णधार सलमान आघा आणि शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या. इतरांनी लहानमोठं योगदान देत संघाला 135 धावांपर्यंत मजल मारून दिली.
गोलंदाजी करताना बांगलादेशच्या तास्किन अहमदने 3 विकेट्स घेतल्या. मेहदी हसन आणि रिशाद हुसैन यांनी प्रत्येकी 2, तर मुस्तफिजुर रहमानने 1 बळी घेतला.
136 धावांचं साधं लक्ष्य समोर असूनही बांगलादेशचा डाव डळमळीत ठरला. शमीम हुसैनने सर्वाधिक 30 धावा केल्या. सैफ हसनने 18, नुरुल हसन व रिशाद हुसैन यांनी प्रत्येकी 16, तर मेहदी हसनने 11 आणि तंझीम साकिबने 10 धावा जोडल्या. पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे बांग्लादेशला लक्ष्य गाठता आले नाही.
आशिया कप कोण जिंकणार?
काही क्रिकेट जाणकार आणि काही स्त्रोतांवरून समोर येणाऱ्या माहितीनुसार भारत आशिया कप फायनल जिंकेल असा अंदाज सध्या तरी व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानची गोलंदाजी ही जमेची बाजू आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर अंतिम सामन्यातील विज अथवा पराजय अवलंबून असणार आहे.
भारतासोबत तिसऱ्यांदा या स्पर्धेत आमनेसामने भिडणार आहे. गटसाखळी आणि सुपर-4 फेरीत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात पाकिस्तान पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे टीम इंडिया आपला दबदबा कायम ठेवून सलग दुसऱ्यांदा आशियाई विजेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्याकडे आहेत.






