Marathi News

18 वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोरलं आयपीएल चषकावर नाव; फायनलमध्ये पंजाबला हरवलं!

Written by:Rohit Shinde
Last Updated:
18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल चषकावर नाव कोरलं आहे. शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्सला धूळ चारत आरसीबीने मोठा विजय प्राप्त केला.
18 वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोरलं आयपीएल चषकावर नाव; फायनलमध्ये पंजाबला हरवलं!

अहमदाबाद: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने अखेर 18 वर्षांची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम आयपीएलच्या 18 व्या मोसामतील चॅम्पियन ठरली आहे. आरसीबीने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

पंजाबला हरवलं; ट्रॉफी जिंकली!

आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर पार पडला. टॉस जिंकत पंजाब किंग्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 190 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान 191 धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांना आरसीबीने चांगलंच रोखून धरलं, आणि अखेर 6 धावांनी विजय मिळविला.

विराटचं स्वप्न अखेर पूर्ण

आरसीबीच्या या विजयासह विराट कोहली याचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्नही पूर्ण झालं आहे. आरसीबीने पंजाबसमोर 191 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पंजाबला 7 विकेट्स गमावून 184 धावा करता आल्या. आरसीबीने अशाप्रकारे चौथ्या प्रयत्नात फायनलमध्ये विजय मिळवला. आरसीबीच्या विजयानंतर विराट भावूक झाला.

आयपीएल 2025 या सीझनचा चॅम्पियन बनल्याबद्दल आरसीबीला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. गेल्या वर्षीही कोलकाता नाईट रायडर्सना एवढीच रक्कम मिळाली होती. एकीकडे बंगळुरूला 20 कोटी रुपये मिळाले असतानाच फायनलमध्ये पराभूत झालेल्या संघाला म्हणजेच पंजाब किंग्जवरही पैशांचा पाऊस पडला आहे. उपविजेतेपदासाठी पंजाबला 13 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स देखील रिकाम्या हाताने परतणार नाहीत, त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचल्याबद्दल बरेच पैसे मिळणार आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews