मुंबईचा राजा रोहित शर्मा (Rohit Sharma) 2026 च्या आयपीएल हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सची साथ सोडणार आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात जाणार अशा बातम्यांनी मागच्या काही दिवसांपासून जोर धरला आहे. त्यातच रोहित शर्माचा खास मित्र असलेल्या अभिषेक नायरला कोलकाता नाईट रायडर्सने मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमल्यानंतर तर या चर्चांना आणखीच उधाण आलं. रोहित शर्मा खरच मुंबई सोडून केकेआर कडे जातोय की काय ??अशी शंका त्याच्या चाहत्यानाही वाटू लागली. मात्र याच दरम्यान मुंबई इंडियन्स ने एक ट्विट करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
काय आहे मुंबई इंडियन्सचे ट्विट –
कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी अभिषेक नायरची नियुक्ती झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा मात्र संघ सोडून कुठे जाणार नसल्याचे सुचक ट्विट केलं. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून रोहित शर्माचा फोटो पोस्ट करण्यात आला आणि त्यासोबत कॅप्शन दिलं की, “उद्या पुन्हा सूर्य उगवेल, हे नक्की आहे… पण (K)night मुश्किल ही नाही, नामुमकिन आहे. या पोस्टमुळे ही गोष्ट स्पष्ट झाली की रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून कुठेही जाणार नाही. तो पुढच्या आयपीएलच्या हंगामात सुद्धा मुंबई इंडियन्स सोबतच राहणार आहे. मुंबईच्या या ट्विट नंतर रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स या दोन्हीच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
रोहित मुंबईची आण बाण शान – Rohit Sharma
दरम्यान रोहित शर्मा हा मुंबईची आन बान आणि शान आहे मुंबईचा राजा की त्याला दिलेली पदवी हेच त्याचं मोठेपण आणि मुंबई इंडियन्सच्या संघातील महत्त्व स्पष्ट करत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच मुंबई इंडियन्स ने तब्बल पाच वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली. भलेही मागच्या दोन वर्षापासून रोहित (Rohit Sharma) मुंबईचा कॅप्टन नाही. अचानकपणे त्याचे कर्णधारपद मुंबई इंडियन्सने काढलं असेल, परंतु आजही मुंबई इंडियन्सचा मुख्य चेहरा म्हणून रोहित शर्मा कडेच बघितलं जात. रोहित शर्माच्या फॅन्समुळेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं वजन बघायला मिळतं. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची वाढती संख्या यामागे सुद्धा रोहित शर्मा मुख्य कारण आहे. अशावेळी रोहित शर्मा जो 2011 पासून मुंबईच्या निळ्या जर्सीत आहे, त्या लाडक्या रोहितला दुसऱ्या कोणत्या संघाकडून खेळताना बघणं मुंबईकर विचारही करू शकत नाहीत.






