T20 Mumbai League – टी२० मुंबई लीग क्रिकेट स्पर्धा मुंबईच्या खेळाडूंसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. ४ जूनपासून ही स्पर्धा सुरु झाली आहे. मंगळवारी झालेल्या चार संघातील सामन्यामधून श्रेयस अय्यरच्या सोबो मुंबई फाल्कन्सने आणि मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सने विजय मिळवत थेट गुरुवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळं गुरुवारी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सोबो मुंबई फाल्कन्स विरुद्ध मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्यात लढत होणार असून, श्रेयस अय्यरच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
श्रेयसच्या संघाचा पाच विकेट्सने विजय
दरम्यान, मंगळवारी झालेल्या सामन्यात आकाश पारकरच्या अष्टपैलू खेळाच्या आणि इशान मुलचंदानीच्या प्रभावी अर्धशतकाच्या जोरावर श्रेयस अय्यरच्या सोबो मुंबई फाल्कन्सने वांद्रे ब्लास्टर्सवर पाच विकेट्सने विजय मिळवत टी२० मुंबई लीग २०२५ च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. तर दुसरीकडे कर्णधार सिद्धेश लाडच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आणि वेगवान गोलंदाज रोहन राजेच्या पाच विकेट्सच्या जबरदस्त खेळीमुळे मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सने मंगळवारी ईगल ठाणे स्ट्रायकर्सवर ८ विकेट्सनी विजय मिळवत टी२० मुंबई लीग २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
कोण कोरणार ट्राफीवर नाव…?
मंगळवारी झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्ट्रायकर्सना धावांची गती मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. डावखुरा फिरकी गोलंदाज आदित्य धुमलच्या मदतीने राजेने आघाडीच्या आणि मधल्या फळीला धक्का दिला आणि १० षटकांत त्यांची धावसंख्या ४ बाद ५७ अशी केली. १३२ धावांचा पाठलाग करताना रॉयल्सने सावध सुरुवात केली. सुरुवातीलाच साहिल जाधवला साईराज पाटीलच्या इनस्विंगरचा अंदाज नाही घेता आला आणि तो बाद झाला.
पण लाडने संयमाने डावाची सूत्रे सांभाळली. त्याने चिन्मय सुतार (१९) सोबत ४८ धावांची भागीदारी केली, सचिन यादव (नाबाद १९) सोबत त्याने ५५ धावांची नाबाद भागीदारी केली आणि १३ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला, गुरुवारी सोबो मुंबई फाल्कन्स विरुद्ध मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्यात कॉंटे की टक्कर होणार आहे. व कोण स्पर्धा जिंकणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.





