टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू आणि रनमशीन विराट कोहली (Virat Kohli) सध्या सुमार फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया विरुदच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झालेला कोहली आज एडलेड येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भोपळा फोडू शकला नाही. सलग दुसऱ्यांदा कोहली शून्यावर बाद झाला आणि त्याच्या चाहत्यांची घोर निराशा झाली. बाद झाल्यानंतर पॅव्हेलियन मध्ये परतत असताना कोहलीने चाहत्यांना असा एक इशारा केला की ज्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना जोर आला. विराटचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कसा बाद झाला कोहली? Virat Kohli
कर्णधार शुभमन गिल आऊट झाल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. एकीकडे रोहित शर्मा चांगला खेळ करत असताना दुसरीकडे विराट कोहली त्याला साथ देईल असं बोललं जात होतं. मात्र विराट फक्त ४ चेंडू मैदानात टिकला. क्झेवियर बार्लेट च्या चेंडूंवर फ्लिक करण्याच्या नादात विराट पायचीत झाला. खाते न उघडताच विराटला बाहेर जावं लागलं. सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाल्याने विराट स्वतःवर नाराज दिसत होता. विराट पॅव्हेलियन मध्ये परतत असताना चाहत्यांनी त्याला स्टँडिंग ओवेशन दिले. विराटने (Virat Kohli) सुद्धा अभिवादन स्वीकारले. मात्र यावेळी त्याच्या एका कृतीने लक्ष वेधले. विराटने ग्लोव्हज दाखवत एका प्रकारे आपला हा या मैदानातील शेवटचा सामना असल्याचंही अप्रत्यक्ष दाखवलं. त्यामुळे विराट तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रोहितची दमदार खेळी –
एकीकडे विराट कोहली शून्यावर बाद झाला असताना दुसरीकडे हिटमॅन रोहित शर्माने मात्र चांगली खेळी केली. रोहितने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत 73 धावा काढल्या. यामध्ये 7 चौकार आणि 2 षटकाराचा समावेश आहे. मिचेल स्टार्क च्या चेंडूवर तो बाद झाला. मात्र आजच्या खेळीने रोहित शर्माने निवड समिती आणि बीसीसीआयला चोख उत्तर दिले आहे. अजूनही आपल्यात भरपूर क्रिकेट बाकी आहे हा संदेशच रोहितने दिला.






