दिव्या देशमुखने २०२५ च्या FIDE महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जीएम हरिका द्रोणवल्लीचा पराभव करून उल्लेखनीय कामगिरी केली आणि दोन्ही टाय-ब्रेक गेम जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यासाठी आता देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. यावेळी दिव्या देशमुख चांगलीच भावूक झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले होते. आता सेमी-फायनलसह अंतिम सामना जिंकण्याचे तिचे लक्ष्य असणार आहे.
दिव्या देशमुखची सेमी-फायनलमध्ये धडक
या विजयासह, दिव्या ही FIDE महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी जीएम कोनेरू हम्पी नंतरची दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. क्लासिकल विभागात हा सामना अत्यंत चुरशीचा होता. पण पहिल्या टाय-ब्रेकमध्ये दिव्याने तिची संधी साधली जेव्हा हरिकाने शेवटच्या गेममध्ये एक महत्त्वाची चूक केली. दुसऱ्या टाय-ब्रेक गेममध्ये, हरिकाला पुनरागमन करण्याची संधी होती परंतु तिने काही संधी गमावल्या आणि दिव्याला हरिकाने केलेल्या चुकांचा फायदा झाला, आणि त्यामुळेच दिव्या देशमुखचा फायनलचा मार्ग सुकर झाला. परिणामी, हरिकाचा खेळ संपला तर दिव्या मोठ्या संयमाने आणि परिपक्वतेने पुढे जात राहिली.
हे ही वाचा
सेमी-फायनलमध्ये कुणासोबत मुकाबला?
आता उपांत्य फेरीत दिव्याचा सामना १६ व्या महिला विश्वविजेत्या चीनच्या ग्रँडमास्टर टॅन झोंगीशी होईल. दुसऱ्या उपांत्य फेरीत, भारताची अव्वल क्रमांकाची महिला खेळाडू ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचा सामना चीनच्या लेई टिंगजीशी होईल, जिने यापूर्वी जॉर्जियाच्या नाना झाग्निडझेचा पराभव केला होता. स्पर्धा अंतिम टप्प्यात प्रवेश करत असताना, सर्वांचे लक्ष भारत विरुद्ध चीन यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यावर असेल, जिथे अंतिम फेरीतील स्थान धोक्यात येईल. फायनलमध्ये कोण लढणार, हे उपांत्य सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. भारताला यंदा WIDE चे जेतेपद मिळते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.