नागपूरच्या दिव्या देशमुखने महाराष्ट्राची मान उंचावली आहे. महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपची दिव्या विजेती ठरली आहे. इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुखनं फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे भारताच्याच कोनेरू हंपीला पराभूत करत तिने हा किताब आपल्या नावावर केला आहे. तिने गेल्या 23 जुलैला फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक दिली होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्यानंतर आता दिव्या देशमुखने अंतिम सामनाच जिंकला आहे.
भारताच्या कोनेरू हंपीचा केला पराभव!
जॉर्जियामधील बाटुमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्याच कोनेरू हंपीने विजय मिळवला होता. त्यामुळे, या अंतिम लढतीत दोन्ही खेळाडू भारताच्याच होत्या. उपांत्य लढतीतल्या दुसऱ्या फेरीत दिव्यानं चीनची माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगयी टॅन हिला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला होता. उपांत्य फेरीचा पहिला डाव बरोबरीत सुटल्यावर दिव्यानं पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना दबावाखाली न येता शानदार कामगिरी बजावली होती. याबरोबरच दिव्या आता 2026 मध्ये होणाऱ्या महिला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे तसंच तिनं आपला पहिला ग्रँडमास्टर नॉर्मही मिळवला आहे.
हे ही वाचा
विजयानंतर दिव्याची काय प्रतिक्रिया?
विजयानंतर दिव्या देशमुखनं दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, “मला आता बोलणं कठीण आहे. अजून बरंच काही साध्य करायचं आहे, ही फक्त सुरुवात आहे.” त्यामुळे दिव्याची ही प्रतिक्रिया भविष्यातील तिची महत्वाकांक्षा अधोरेखित करते.
दिव्या देशमुख नेमकी कोण?
दिव्या देशमुख ही मूळची नागपूरची असून तिचा जन्म 9 डिसेंबर 2005 ला झाला. तिचे वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत. ती भवन्स सिव्हिल लाइन्स शाळेची विद्यार्थिनी असून लहानपणापासूनच ती बुद्धिबळ खेळण्यात पारंगत आहे. त्यामुळे दिव्या महाराष्ट्राची कन्या असल्याने या निमित्ताने महाराष्ट्राची मान उंचावली आहे.