यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान मॅच होणार नाही?, काय आहे शक्यता?

Written by:Smita Gangurde
Published:
यानंतर आयसीसीनं पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा दिलाय. टी-20 वर्ल्डकप पाकिस्ताननी खेळला नाही तर त्याविरोधात मोठी कारवाई आयसीसीकडून होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान मॅच होणार नाही?, काय आहे शक्यता?

मुंबई– यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपपूर्वीच राजकीय वाद सुरु झाला आहे. बांगलादेशची टीम वर्ल्डकमधून बाहेर पडलीय. तर पाकिस्तान या टी-20 वर्ल्कपमध्ये टीम इंडियासोबत मॅच खेळणार नाही, अशी शक्यता आता वर्तवण्यात येतेय. 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणारी ही मॅच आता होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येतेय. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी टीम इंडियासोबत न खेळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

कधी होणार निर्णय?

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी हे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेणार आहेत. या दोघांच्या बैठकीनंतर टीम इंडियासोबत मॅच खेळण्याबाबत निर्णय होईल असं सांगण्यात येतंय.

बांगलादेशची टीम का पडली बाहेर?

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं या वर्ल्डकपमधील त्यांच्या मॅचेस या भारताबाहेर श्रीलंकेत खेळवाव्यात अशी मागणी केली होती. क्रिकेटपटूंच्या सुरक्षेच्या कारणासाठी ही मागणी करण्यात येत असल्याचं क्रिकेट बोर्डातर्फे सांगण्यात आलं होतं. आयसीसीनं भारतात मॅच खेळण्यात कुठलाही धोका नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तरीही बांगलादेश ऐकण्यास तयार नव्हता. अखेरच्या क्षणापर्यंत या वादावर तोडगा निघाला नाही, त्यामुळं आयसीसीनं बांगलादेशला हटवून त्याजागी स्कॉटलंडला संधी देण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तान खेळला नाही तर काय होणार?

पाकिस्ताननं जर ग्रुप स्टेजवर असलेली टीम इंडियासोबतची मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे २ पाँइंट्स कट होणाची शक्यता आहे. यात पाकिस्तानचंच मोठं नुकसान होईल. यासह पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फटका किंवा दंडही भरावा लागण्याची शक्यता आहे. आयसीसीलाही ही मॅच झाली नाही तर मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता आहे.

पाकिस्ताननं वर्ल्ड कप खेळला नाही तर खैर नाही

बांगलादेश टीमला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्ताननंही टी-20 वर्ल्डकप न खेळण्याचा इशारा दिलाय. यानंतर आयसीसीनं पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा दिलाय. टी-20 वर्ल्डकप पाकिस्ताननी खेळला नाही तर त्याविरोधात मोठी कारवाई आयसीसीकडून होण्याची शक्यता आहे.