IPL PBKS RCB: पावसाचा व्यत्यय पंजाबच्या पथ्यावर, आरसीबीचा दारूण पराभव

Written by:Rohit Shinde
Published:
पावसाचा व्यत्यय पंजाब किंग्सच्या पथ्यावर पडला आहे. आरसीबीला पराभवाचा धक्का पंजाबने दिला आहे. गुणतालिकेत पंजाबचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
IPL PBKS RCB: पावसाचा व्यत्यय पंजाबच्या पथ्यावर, आरसीबीचा दारूण पराभव

बंगळुरू: बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडीयमवर पावसाचा व्यत्यय पंजाब किंग्स संघाच्या पथ्यावर पडला आहे. जवळपास 2 तास उशिरा हा सामना सुरू झाला होता, त्यामध्ये पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 14 षटकांत 96 धावांचे दिलेले आव्हान अगदी सहजरित्या गाठले, आणि आपला विजय निश्चित केला. बंगळुरूने समोर ठेवलेले 96 धावांचे आव्हान पंजाब संघाने अवघ्या 12.1 षटकांत गाठले. 11 चेंडू आणि 5 गडी राखून पंजाबने विजय मिळवला.

पावसाचा व्यत्यय पंजाबच्या पथ्यावर

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारा हा सामना रात्री 7.30 वाजता सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, पावसाच्या व्यतयामुळे सामना जवळपास दोन तास उशिराने म्हणजेच रात्री 9.30 वाजता सुरू झाला. सामन्याच्या सुरूवातीला टॉस जिंकत पंजाब किंग्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्को यान्सिन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग यांच्या गोलंदाजीसमोर आरसीबीच्या फलंदाजांचा फार काळ टीकाव लागला नाही.  मार्को यान्सिन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले.

14 षटकांच्या सामन्यात टीम डेव्डिडच्या नाबाद 50 धावा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली धावसंख्या उभारता आली नाही. रजत पाटीदार, विराट कोहली यांसारखे स्टार फलंदाजही स्वस्तात बाद झाले, आरसीबीला अवघ्या 95 धावा करता आल्या.

96 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना पंजाब संघाकडून नेहल वढेरा नाबाद 33, प्रियांश आर्य 16 अशी धावसंख्या उभारली. आरसीबीच्या गोलंदाजांना पंजाबला रोखण्यात अपयश आले, आणि अखेरीस बंगळुरूने समोर ठेवलेले 96 धावांचे आव्हान पंजाब संघाने अवघ्या 12.1 षटकांत गाठले. 11 चेंडू आणि 5 गडी राखून पंजाबने विजय मिळवला.

आरसीबीची वाटचाल अवघड?

सध्या गुणतालिकेतील चित्र पुर्णत: बदलले आहे.  7 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवत पंजाब दुसऱ्या स्थानावर तर 7 पैकी 4 सामने जिंकत बंगळुरू चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आयपीएल 2025 ची रॉयल चॅलेंजर्सनी जरी दिमाखदार केली असली तरी आता आपले आव्हान कायम ठेवणे, संघाला कठिण जात आहे, पुढील काही सामन्यांमध्ये विजय न मिळाल्यास संघाच्या प्ले ऑफ्सच्या वाटा बंद होणार आहेत. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स आपल्या कामगिरीत काही सुधारणा करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews