IPL 2025: आयपीएलमध्ये आज डबल धमाका, दिल्ली VS गुजरात आणि लखनऊ VS राजस्थानचा सामना

Written by:Rohit Shinde
Published:
आयपीएलचे आज दोन सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स भिडतील. तर दुसऱ्या सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये होईल.
IPL 2025: आयपीएलमध्ये आज डबल धमाका, दिल्ली VS गुजरात आणि लखनऊ VS राजस्थानचा सामना

नवी दिल्ली: आयपीएल 2025 च्या हंगामात आज डबल धमाका पाहायला मिळणार आहे. सिझनमधील 35 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सच्या दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आज दुपारी 03.30 वाजता हा सामना सुरू होईल. तर दुसरीकडे 36 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांदरम्यान रात्री 8 वाजता खेळला जाईल, जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडीयमवर हा सामना होईल. सर्वच संघ आपली प्ले ऑफ्सची दारं खुली करण्यासाठी खेळताना दिसत आहेत.

दिल्ली विरूद्ध गुजरात, कोण जिंकणार?

दिल्ली आणि गुजरात दोन्ही संघ आयपीएल प्ले ऑफ्सचा मार्ग सुकर करण्यासाठी खेळताना दिसत आहेत. दिल्लीने आयपीएल 2025 च्या हंगामात आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. पैकी 5 सामन्यांत दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवता आला आहे. तर मुंबईविरूद्धचा एक सामना दिल्लीला गमवावा लागला आहे. 10 गुणांसह दिल्ली गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर गुजरात टायटन्स 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 6 पैकी 4 सामने गुजरात टायटन्सने जिंकले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघाचा आजवरचा इतिहास पाहिला असता असे दिसते की, दोन्ही संघ शेवटच्या 5 सामन्यांत आमनेसामने आले असता दिल्लीने 3 तर गुजरातच्या संघाला 2 सामने जिंकता आले आहेत. असं असलं तरी जाणकार आणि क्रिकेट तज्ज्ञांच्या मते आजचा सामना सांघिक कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्स जिंकण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.

राजस्थान विरूद्ध लखनऊ, कुणाचं पारडं जड?

राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आयपीएलच्या सीझनमधील आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी झगडत आहेत. राजस्थानच्या संघाला खेळलेल्या 7 पैकी अवघे दोन सामने जिंकता आले आहेत, 4 गुणांसह संघ सध्या गुणतालिकेत 8 व्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2025 च्या हंगामात 7 सामने खेळले असून पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 8 गुणांसह संघ गुणतालिकेत सध्या 5 व्या स्थानावर आहे.

दोन्ही संघांमधील शेवटच्या 5 सामन्यांत दोन्ही संघ आमनेसामने आले असता राजस्थानने   4  तर लखनऊच्या संघाने 1 सामना जिंकला आहे. असं असलं तरी आजच्या या सामन्यात लखनऊचा संघ विजय मिळवेल, असं जाणकार सांगत आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews