मुंबई- भारतीय इतिहासात मोठी युद्धं झाली, साम्राज्यं उभी राहिली आणि कोसळली. परंतु या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्यानं समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं स्थान अग्रभागी आहे. महाराष्ट्रात चौंडी या गावात जन्मलेल्या अहिल्याबाईंनी इतिहासात मानाचं स्थान निर्माण केलेलं आहे.
अहिल्याबाई होळकरांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित नसतं, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं. अहिल्याबाई होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या महाराणी नव्हत्या तर त्या एक द्रष्ट्या प्रशासक, न्यायप्रिय नेत्या, धर्मपरायण समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या.
अहिल्याबाईंनी केलेली ही 10 कामं अद्वितीय !
१. अहिल्याबाईंचं नेतृत्व केवळ राज्यकारभारापुरतं मर्यादित नव्हतं. तर त्यात धर्म, न्याय, लोकसेवा आणि नीतीमूल्यांचं सखोल अधिष्ठान होतं.
२. अहिल्याबाईंनी महेश्वरला आपली राजधानी बनवली. ही राजधानी एक आदर्श प्रशासनाचं प्रमाण होतं. या ठिकाणी अहिल्याबाईंनी एक पारदर्शक, न्यायपूर्ण आणि लोकाभिमुख राज्यकारभार चालवला.
३. अहिल्याबाई दररोज प्रजेसोबत संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेत आणि न्याय देत. हे त्यांचं कार्य आजच्या लोकशाही व्यवस्थेलाही मार्गदर्शक ठरावं असचं आहे.
४. अहिल्याबाईंचं संपूर्ण आयुष्य धार्मिक स्थळांचं पुनरुज्जीवन आणि समाजकल्याण यासाठी वाहिलेलं पाहायला मिळतं. काशी विश्वनाथ, गंगाघाट, रामेश्वरम, सोमनाथ, द्वारका अशा अनेक प्राचीन आणि पवित्र स्थळांचा जीर्णोद्धार त्यांनी केला.
५. देशभर त्यांनी शेकडो धर्मशाळा, घाट, कुंड, विहिरी, अन्नछत्रं आणि विश्रामगृहं उभारली. हे कार्य कोणत्याही जाती-धर्माचा भेद न करता सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलं. त्यांच्या या पुढाकारामुळे हजारो लोकांना निवारा, अन्न आणि आधार मिळाला.
६. अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं सामाजिक कार्य आजही संपूर्ण भारतात लोककल्याणकारी राज्यशासनाचा आदर्श नमुना मानलं जातं.
७. प्रशासन आणि समाजकारण यांचा असा सुरेख मिलाफ क्वचितच इतिहासात पाहायला मिळत आणि त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
८. अठराव्या शतकातील भारतात स्त्रियांना घराच्या चार भिंतींपलीकडे जाण्याची मुभा नव्हती. पण अशा काळातही अहिल्याबाई यांनी स्त्रिया आत्मनिर्भर बनाव्या यासाठी पुढाकार घेतला. त्या काळात त्यांनी सुरू केलेला महेश्वरी साडी उद्योग केवळ व्यवसाय नव्हता तर तो एक सामाजिक क्रांतीचा भाग होता.
९. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी काशी आणि इतर ठिकाणांहून कुशल विणकरांना महेश्वरला बोलावले. त्यांनी स्थानिक महिलांना हातमाग प्रशिक्षण दिलं, आणि महिलांना घरोघरी बसून उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण केली.
१०. या उद्योगानं हजारो महिलांना केवळ रोजगारचं दिला नाही, तर स्वाभिमान, ओळख आणि आत्मसन्मानही दिला. आजही महेश्वर आणि आसपासच्या भागात महेश्वरी साड्या विणणाऱ्या हजारो महिला आपल्याला पहायला मिळतात. या साड्या केवळ पारंपरिक पोशाख नाहीत, तर त्या अहिल्याबाईंच्या द्रष्ट्या धोरणांचा आणि स्त्रीसन्मानाच्या तत्त्वांचा वस्त्ररूप अविष्कार आहेत.
त्यांनी कोणत्याही जाती, धर्म, वर्ग यांचा भेद न करता सर्वांसाठी कार्य केलं.
महिला सक्षमीकरणासाठी मोठं योगदान
अहिल्याबाईंच्या या कार्यामुळेच त्यांना ‘पुण्यश्लोक, ‘लोकमाता’ आणि ‘राजमाता’ अशा सन्मानार्थ उपाधी प्राप्त झाल्या. इ.स. 1767 साली त्यांनी महेश्वर येथे हातमाग उद्योग सुरू करून एक स्थायिक, गुणवत्ताधिष्ठित आणि बाजारपेठेचा विचार करणारा स्थानिक उद्योग उभारला. यामागील हेतू होता तो स्त्रियांना उपजीविकेचा मार्ग उपलब्ध करून देणं आणि महेश्वरला धार्मिक आणि पारंपरिक वस्त्रकलेचे केंद्र बनवणं. महेश्वरी साडी आणि अहिल्याबाई यांचे नाते केवळ वस्त्रनिर्मितीपुरते मर्यादित नाही, तर ते महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक उद्योगाचा उत्कर्ष यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे.





