इन्टाग्रामच्या ओळखीनं गेला जीव, अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या तरुणाची आत्महत्या, पोलिसांची चौकशी वादात

Written by:Smita Gangurde
Published:
पोलीस कोठडीतील या आत्महत्या प्रकरणाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
इन्टाग्रामच्या ओळखीनं गेला जीव, अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या तरुणाची आत्महत्या, पोलिसांची चौकशी वादात

नागपूर – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीने पोलीस ठाण्याच्या लॉकअप मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. नागेंद्र भाटीया असं आत्महत्या केलेल्या 19 वर्षीय तरुणाचे नाव आहे, पोलीस कोठडीतील या आत्महत्या प्रकरणाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

नेमकं काय घडलं?

नागेंद्र भाटीया हा तरुण उत्तरप्रदेश मधील प्रयगराज येथील राहणारा, तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. इंस्टाग्रामच्या माध्यमातून नागपूरच्या एका 16 वर्षीय मुलीशी त्याची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झालम. लग्नाच्या आणा-भाका घेतल्या, यासाठी तो डिसेंबर महिन्यात नागपुरात देखील आला होता. एका आठवड्यापूर्वी नागेंद्र पुन्हा नागपूरात आला आणि दोघेही नागपुरातून पळून गेले.

तरुणाला अटक, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

या मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तपासा दरम्यान मुलगी प्रयागराजला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी प्रयागराजला जाऊन नागेंद्रला अटक केली आणि मुलीला कुटुंबियांच्या स्वाधीन केलं. अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नागेंद्रवर पोलिसांनी दाखल केला. बुधवारी आरोपी नागेंद्रला कोर्टात हजर केल्यावर कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या

पोलीस कोठडीत पहाटेच्या सुमारास नागेंद्र उठला,त्याने शौचालयातून लपवून डबा आणला आणि चादर फाडून कोठडीच्या रॉडला बांधून गळफास घेतला.काही वेळाने पोलीस कर्मचारी पोहचल्यावर नागेंद्र गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला,वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली.

अधिकाऱ्यासह चार पोलीस निलंबित

कोठडीतील मृत्यूप्रकरणी एका सहायक पोलिस निरीक्षकासह एकूण चार पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यात हयगय केल्याप्रकरणी तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. आत्महत्येच्या दिवशीच सकाळी नागपुरात पोहचलेल्या नागेंद्रच्या आई-वडिलांना मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच धक्का बसला.

पोलिसांनी लाच मागितल्याचा तरुणाच्या वडिलांचा आरोप

मुलाला पोलिसांनी अटक केल्यावर गुन्हे मागे घेण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप नागेंद्रच्या वडिलांनी केलाय, तेच पैसे घेऊन सकाळी नागपुरात पोहचले मात्र मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजताच होत्याचे नव्हते झाले. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागेंद्रच्या वडिलांनी केली आहे.

तरुणावर पोक्सो लावल्याने घाबरला

प्रयागराजवरून नागेंद्र आणि मुलीला ताब्यात घेऊन नागपुरात आल्यावर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली,वैद्यकीय तपासणीत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी नागेंद्रवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे तो हादरला होता. कोठडीत आरोपीवर लक्ष ठेवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे, या प्रकरणात आता सीआयडी कडून तपास करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेज,स्टेशन डायरी आणि इतर तपशील ताब्यात घेतले आहेत.