A R Rahman : प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीनंतर त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. बॉलिवूडमधील कामाच्या संधी, धर्माशी संबंधित मुद्दे आणि उद्योगातील वातावरणाबद्दल त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे विविध राजकीय आणि फिल्मी वर्तुळांकडून प्रतिक्रिया येत होत्या. याच वादाच्या पार्श्वभूमीवर रहमान यांनी पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत स्वतःचे मत स्पष्ट केले आहे.
कधी कधी आपल्या हेतूंचा गैरसमज (A R Rahman)
रहमान यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. त्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले की संगीत हे त्यांच्यासाठी नेहमीच संस्कृतीशी जोडणारे, तिचा सन्मान करणारे आणि लोकांना जवळ आणणारे माध्यम आहे. भारताबद्दल बोलताना त्यांनी देशाला आपली प्रेरणा, गुरु आणि घर असल्याचं सांगितलं. त्यांचा उद्देश कधीही कुणाला दुखावण्याचा नसून, संगीताच्या माध्यमातून लोकांना उंचावणे आणि सेवा करण्याचा असल्याचे त्यांनी नमूद केले. कधी कधी आपल्या हेतूंचा गैरसमज होतो, पण त्यांच्या मनात कोणतीही वाईट भावना नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. भारतीय असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान असून, भारताने त्यांना मिळवून दिलेल्या सर्जनशील स्वातंत्र्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चा रंगत असून अनेकांनी त्यांचे मत समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी रहमान यांच्या स्पष्टिकरणाचे स्वागत केले, तर काहींनी त्यांची पूर्वीची मुलाखत संदर्भापासून दूर नेऊन सादर केल्यामुळे गैरसमज वाढल्याचे म्हटले.A R Rahman
छावा बद्दल काय म्हणाला होता रहमान
दरम्यान BBC ला दिलेल्या एका मुलाखतीत रहमान यांनी अभिनेता विक्की कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाबद्दलही मत व्यक्त केले होते. त्यांनी या चित्रपटाला समाजात विभागणी निर्माण करणाऱ्या कथानकांपैकी एक असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर फिल्म इंडस्ट्रीतील काही पद्धतींवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या विधानानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागला होता. रहमान यांची नवी प्रतिक्रिया समोर आल्यानंतर आता प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न कमी होतील की वाद आणखी पुढे वाढेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यांच्या या व्हिडिओबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे, हे जाणून घेण्यासाठीही नेटिझन्समध्ये चर्चा सुरू आहे.





