Marathi News

शार्क टँक इंडिया 5’ वर नेहा मर्दाचा आरोप! “एपिसोड डेली सोपसारखा वाटला

Published:
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री नेहा मर्दा अलीकडेच भाऊ सुमित मर्दा आणि त्यांचे पार्टनर राहुल यांच्यासोबत ‘शार्क टँक इंडिया 5’ मध्ये त्यांच्या *‘फिटकू’* या ब्रँडची पिच घेऊन सहभागी झाली होती
शार्क टँक इंडिया 5’ वर नेहा मर्दाचा आरोप! “एपिसोड डेली सोपसारखा वाटला

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री नेहा मर्दा अलीकडेच भाऊ सुमित मर्दा आणि त्यांचे पार्टनर राहुल यांच्यासोबत ‘शार्क टँक इंडिया 5’ मध्ये त्यांच्या *‘फिटकू’* या ब्रँडची पिच घेऊन सहभागी झाली होती. फिटकू हे रिफाइंड फिटकरीपासून बनवलेले नैसर्गिक डिओडरंट स्टिक आहे. नेहाला गर्भधारणेनंतर वाढलेल्या बॉडी ओडरमुळे या उत्पादनाची कल्पना सुचली. पिचदरम्यान त्यांनी 1.8 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी 1% इक्विटीची ऑफर दिली.

त्यांना गुंतवणूक मिळाली; पण अट होती की अमन गुप्ता आणि अनुपम मित्तल यांना त्यासाठी तीन पट म्हणजेच 5.4 कोटी रुपयांची रॉयल्टी द्यावी लागणार होती. मात्र एपिसोड प्रसारित झाल्यानंतर नेहा आणि सुमित यांनी त्यांच्या पिचचे एडिटेड स्वरूप पाहून नाराजी व्यक्त केली आहे.

नेहाने सांगितला अनुभव

नेहा मर्दाने त्यांच्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितले की, गुंतवणूकदारांसमोर व्यवसाय मांडणे हे अत्यंत वेगळे आणि ताणतणावाचे होते. ती म्हणाली की, “शोमध्ये उभं राहणं म्हणजे जणू एकाच वेळी दहावी आणि बारावीची परीक्षा देण्यासारखं वाटलं. मी आयुष्यात अनेक निर्मात्यांसमोर उभी राहिले पण गुंतवणूकदारांसमोर बिझनेस पिच ही पहिलीच वेळ होती.”

सुमित यांनीही हा अनुभव खूप वेगळा आणि आव्हानात्मक असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, स्टुडिओतील प्रकाशयोजना, कॅमेरे, आणि एकाचवेळी पाच शार्ककडून पडणारे प्रश्न—या सर्वामुळे पिच अधिक तीव्र भासू लागली. “एकाचा प्रश्न संपताच दुसरा प्रश्न समोर असायचा,” असे ते म्हणाले.

एपिसोडच्या एडिटिंगबद्दल नाराजी

नेहा मर्दाने सर्वात मोठी नाराजी व्यक्त केली ती एपिसोडच्या एडिटिंगबद्दल. तिच्या म्हणण्यानुसार, “शोमध्ये आम्ही जवळपास दोन तास होतो, पण प्रसारित झालेला भाग फक्त 17-20 मिनिटांचा होता. त्यामुळे दाखवलेला नाट्यमय भाग प्रत्यक्षात तितका तीव्र नव्हता. ज्या क्षणी शार्कने आमच्या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला, ते दृश्य टेलिकास्टच झाले नाही.”

सुमितनेही एडिटिंग आणि पार्श्वसंगीतामुळे एपिसोडची दिशा पूर्णपणे बदलली गेल्याचे मान्य केले. “एपिसोड पाहताना आम्हालाही वाटलं की पुढे काय मोठं घडणार आहे,” असे ते म्हणाले. नेहाला तर शेवटच्या क्षणी जाहिरात ब्रेकच्या आधी असा भास झाला की त्यांना सौदा मिळणार नाही—जरी प्रत्यक्षात शूटिंगदरम्यान त्यांना असा क्षण एकदाही जाणवला नव्हता.

त्यांच्या म्हणण्यानुसार, शार्क्सकडून जे प्रश्न विचारले गेले ते व्यवसायाच्या संदर्भात स्पष्ट करणारे होते, आणि दोन मोठ्या शार्कने गुंतवणूक केली म्हणजे प्रकल्प स्पष्ट आणि मजबूत असल्याचे सूचित होते. मात्र प्रसारित भागात पूर्ण परिस्थितीला ‘ड्रामा’चा रंग दिला गेला, याबद्दल त्यांची खंत स्पष्ट दिसली. नेहा व सुमितच्या या विधानांमुळे ‘शार्क टँक इंडिया’मधील एडिटिंग आणि प्रेझेंटेशन पद्धतीवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews