अक्षय कुमारच्या ताफ्याचा अपघात; ऑटोचालक गंभीर जखमी, कुटुंबाची मदतीची विनंती

Published:
पोलिसांनी अपघाताची प्राथमिक चौकशी सुरू केली असून धडकेचे कारण, वाहनांचा वेग आणि रस्त्यावरील परिस्थिती याचा अभ्यास केला जात आहे
अक्षय कुमारच्या ताफ्याचा अपघात; ऑटोचालक गंभीर जखमी, कुटुंबाची मदतीची विनंती

मुंबईच्या जुहू परिसरात 19 जानेवारी 2026 रोजी उशिरा रात्री घडलेल्या अपघाताने स्थानिक नागरिकांसह संपूर्ण मनोरंजनसृष्टीचे लक्ष वेधून घेतले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या सुरक्षा ताफ्यातील मर्सिडीज कारने एका ऑटो रिक्शाला मागून धडक दिल्याने भीषण अपघात घडला. धडकेची तीव्रता इतकी होती की ऑटो पुढे फेकला जाऊन अक्षयच्या ताफ्यातील इनोवा कारवर आदळला आणि उलटून रस्त्याच्या कडेला फेकला गेला. या घटनेत ऑटोचालक आणि त्यातला प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं ?

घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की अपघात अतिशय क्षणार्धात झाला आणि ऑटो पलटताच प्रवासी आणि चालक दोघेही आत अडकून पडले होते. स्थानिक रहिवासी, सिक्युरिटी टीम आणि पोलिसांनी त्वरेने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले. अपघातानंतरच्या काही क्षणांत काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्यात दुर्घटनेची तीव्रता स्पष्ट दिसते.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऑटोचालकाचा भाऊ मोहम्मद समीर याने घटनेनंतर माध्यमांशी बोलताना आपली व्यथा व्यक्त केली. त्याने सांगितले की त्यांचा ऑटो पूर्णपणे नादुरुस्त झाला असून त्याचा भाऊ सध्या गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. त्याने केलेली विनंती साधी पण भावनिक होती. त्याने म्हटले की त्यांचा परिवार आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे आणि त्यांना केवळ योग्य उपचार, आवश्यक औषधे आणि फुटलेल्या ऑटोची भरपाई एवढीच मदत हवी आहे. त्याच्या या वक्तव्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेकांनी सहानुभूती दर्शवली आहे.

अक्षय कुठ होता

अपघाताच्या वेळी अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना हे एअरपोर्टवरून घरी परतत होते. दोघेही काफिल्यातील दुसऱ्या गाडीत असल्याने त्यांना काहीही इजा झाली नाही. तरीही या अपघातामुळे त्यांच्या सुरक्षा ताफ्याच्या वेग आणि शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मोठ्या सेलिब्रिटींच्या ताफ्यातील गाड्यांचा वेग आणि वाहतूक नियमांचे पालन हा मुद्दा अनेकदा पुढे येतो आणि या घटनेनंतर या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

पोलिसांनी अपघाताची प्राथमिक चौकशी सुरू केली असून धडकेचे कारण, वाहनांचा वेग आणि रस्त्यावरील परिस्थिती याचा अभ्यास केला जात आहे. जखमींच्या उपचारांची व्यवस्था आणि नुकसानभरपाईबाबतही अधिकारी लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत अक्षय कुमार किंवा त्यांच्या टीमकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. या घटनेने सेलिब्रिटी ताफ्यांच्या वाहतुकीवरील सुरक्षिततेच्या नियमांचे पालन, तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा महत्त्वाचा प्रश्न समोर आणला आहे.

 

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews